
मुंबई : पर्यावरणाच्या संवर्धनासह महिलांच्या आरोग्यासाठी पालिकेने २०० हून अधिक सार्वजनिक प्रसाधनगृहात पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकीन वेडिंग मशीन व इन्सिनरेटर यंत्र कार्यान्वित केले आहे. महिलांना सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्यासह शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे यासाठी प्रत्येक प्रशासकीय विभागात सॅनिटरी पॅड डिस्पोजल युनिट्स बसवण्यात येत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने या कचऱ्याची विल्हेवाट स्वतंत्रपणे लावणे गरजेचे असून, या प्रकल्पांमुळे पर्यावरणाचे नुकसान टाळता येणार आहे, असेही घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांनी सांगितले.
मुंबईतील विविध स्वयंसेवी संस्था, बुद्धिजीवी, लोकप्रतिनिधी यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग संयंत्रे बसविण्याची मागणी केली. तर, महिलांच्या आरोग्या रक्षणाच्या दृष्टीने सॅनिटरी पॅडचा वापर वाढावा, यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले. तसेच, वापरात आलेले सॅनिटरी पॅड हे वैद्यकीय कचरा म्हणून गणले जातात. साहजिकच त्यांच्या शास्त्रोक्त विल्हेवाट बाबतही महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. सॅनिटरी पॅडची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत.
-मासिक पाळी आरोग्य आणि स्वच्छता व्यवस्थापनासाठी, जागतिक आरोग्य संघटनेच्या स्वच्छता योजनेच्या अनुषंगाने महानगरपालिकेने प्रत्येक प्रभागात 'कॉम्बो सॅनिटरी नॅपकीन वेंडींग - इन्सिनेरेटर मशीन' बसविण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे.
-सॅनिटरी पॅड पुरवणे आणि वापरानंतर सॅनिटरी पॅडची योग्यरीत्या विल्हेवाट लावणे ही दोन्ही कार्य या संयंत्रामधून केली जातात. पहिल्या टप्प्यात झोपडपट्टी बहुल व तत्सम विभागांत लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
-या उपक्रम अंतर्गत वॉल-माउंटेड सॅनिटरी पॅड डिस्पेंसिंग मशिन्स बसविण्यात येत आहेत. झोपडपट्ट्यांमधील गरजू महिलांना माफक दरात सॅनिटरी पॅड्स उपलब्ध देणे आणि वापरलेल्या सॅनिटरी पॅड्सची योग्यरीत्या विल्हेवाट लावणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
९५० अंश सेल्सिअस तापमानावर प्रक्रिया!
नॅपकीन इन्सिनरेटरमध्ये दुहेरी दहन कक्षाची व्यवस्था आहे. एका कक्षामध्ये दहन आणि दुस-या कक्षामध्ये वायुवर किमान ९५० अंश सेल्सिअस तापमानावर प्रक्रिया केली जात आहे. त्यामुळे कोणतेही घातक वायू वातावरणात सोडले जात नाहीत. पालिकेने सुरूवातीला २०० नग कॉम्बो संयंत्रे सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये बसविले आहेत. या संयंत्रांचा वापर, कार्यक्षमता आणि प्रचालनाचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे.
प्रतिक्रिया
महापालिकेची ३ हजार २५४ , 'म्हाडा'ची ३ हजार ६५९ तसेच ' पैसे द्या व वापरा' तत्वावरील ७७२ आणि इतर ६०१ अशी एकूण ८ हजार २८६ सार्वजनिक प्रसाधनगृहे आहेत. त्यापैकी झोपडपट्टया आणि तत्सम वस्ती परिसरातील प्रसाधनगृहात 'कॉम्बो सॅनिटरी नॅपकीन वेंडींग - इन्सिनेरेटर मशीन' बसविण्याची कार्यवाही सुरू आहे. सद्यस्थितीत १३ प्रशासकीय विभागातील २०० प्रसाधनगृहात 'कॉम्बो सॅनिटरी नॅपकीन वेंडींग - इन्सिनेरेटर मशीन' कार्यान्वित आहे.
- चंदा जाधव,उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग