
मुंबई : महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षकानेच तीन अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार विक्रोळी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून आरोपी क्रीडा शिक्षक सौरभ दीपक उचाटे (वय २३) विरुद्ध विक्रोळी पोलिसांनी लैंगिक, अनैसर्गिक लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली आहे. पालिका शाळेतील या घटनेने पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
विक्रोळीतील टागोर नगरात महानगरपालिकेची पब्लिक हायस्कूल नावाची एक शाळा आहे. याच शाळेत सौरभ हा पीटी शिक्षक म्हणून काम करतो. गेल्या काही दिवसांपासून सौरभ हा दुसरीत शिकणाऱ्या काही अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करत होता. याबाबत एका मुलीने तिच्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर इतर पालकांनी त्यांच्या मुलांकडे विचारपूस केल्यानंतर तीन मुलींवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले होते. शिक्षेच्या नावाने सौरभ हा या मुलींसोबत लैंगिक अत्याचार करत होता. हा प्रकार समजताच पालकांनी शाळेत जाऊन त्याला जाब विचारून बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्याला घेऊन पालक विक्रोळी पोलीस ठाण्यात आले होते.
या घटनेची विक्रोळी पोलिसांनी गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली. चौकशीनंतर सौरभविरुद्ध पोलिसांनी लैंगिक, अनैसर्गिक लैंगिक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला मेडिकलसाठी नेण्यात आले होते. सौरभ हा ठाणे येथील लोकमान्य नगर परिसरात राहत असून, गेल्या आठ दिवसांत त्याने या तिन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बुधवारी त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलीशी शिक्षकाने केलेल्या या अत्याचाराच्या वृत्ताने शाळेतील इतर शिक्षक, पालक आणि विद्यार्थी वर्गात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.