मुंबई: बॉम्बची धमकी देणाऱ्या एका तरुणाला दोन तासांत आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.
आरोपीचे नाव रुख्सार अहमद असून तो व्यवसायाने टेलर आहे. त्याची मानसिक स्थिती चांगली नसून मानसिक तणावातून त्याने शनिवारी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करुन बॉम्बची धमकी दिली होती. त्याची पोलिसाकडून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. शनिवारी दुपारी एक वाजता एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला कॉल केला होता. या व्यक्तीने मुंबईत शंभर किलोचा बॉम्ब असल्याचे सांगून कॉल बंद केला होता. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मोबाईल क्रमांकाचा शोध घेतला. तो मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या पथकाने अवघ्या दोन तासांत रुख्सार अहमद या तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच त्याच्या मोबाईलवरुन बॉम्बची ही धमकी दिल्याचे उघडकीस आले. रुख्सार हा टेलर असून गेल्या काही दिवसांपासून तो प्रचंड मानसिक तणावात होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने कॉल करुन बॉम्बची धमकी दिली होती.