
गोरेगाव येथील दिनकरराव देसाई मार्गासह (आरे कॉलनी मार्ग) परिसरातील विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. या रस्तेकामांत प्राण्यांची विशेष काळजी घेतली असून, रस्त्याखालून प्राण्यांसाठी स्वतंत्र भुयारी मार्ग करण्यात आला आहे.
वनखात्याच्या सल्ल्यानुसार हे काम होत असून, झाडांना जीवनदान देत रस्ते प्रकल्प राबवण्यात येत आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ( प्रकल्प) पी. वेलरासू यांनी मंगळवारी या रस्तेकामांची पाहणी केली. दरम्यान, पोईसर नदी परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी डहाणूकर वाडी ते लिंकिंग रोडदरम्यान नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे. ८० मीटर लांब व १७ मीटर रुंद असणाऱ्या या पुलामुळे परिसरातील नागरिकांना आणखी एक नवा रस्ता उपलब्ध होणार असून या कामाचीही वेलरासू यांनी पाहणी केली.
पालिकेच्या माध्यमातून पावसाळापूर्व कामे अंतिम टप्प्यात असून समाधानकारकरीत्या काम सुरू असल्याचे यावेळी पी. वेलरासू यांनी सांगितले. अंधेरी तेली गल्ली येथील उड्डाणपुलाचे कामही सध्या प्रगतिपथावर आहे. ५७० मीटर लांब व १७ मीटर रुंदीचा हा पूल आहे. गोरेगाव शास्त्रीनगर नाल्यालगत संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. या ठिकाणी रस्त्याचे कामही केले जाणार आहे. कांदिवली पश्चिम येथील पोयसर नदीलगत लवकरच संरक्षक भिंत बांधण्यात येणार असून, या ठिकाणची बांधकामे हटवण्यात आली आहेत. मुंबईत विविध प्रभागात रस्ते, पूल व पर्जन्य जलवाहिन्यांची कामे सुरू आहेत. पावसाळापूर्व सुरू असलेल्या कामांचा वेलरासू यांनी मंगळवारी आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.