
विविध प्रयोग करूनही उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलने पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे एसी लोकलकडे अद्याप प्रवासी खेचून घेता आलेले नाहीत. अलीकडेच तिकिटांचे दर कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही हार्बर मार्गावरील प्रवाशांनी या सेवेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकल फेऱ्या पूर्णपणे बंद होणार असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटींवरून सांगितले.
सद्य:स्थिती पाहता सीएसएमटी ते कल्याण/कसारा/कर्जत या मुख्य मार्गावरील वातानुकूलित लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाल्याने हार्बर मार्गावरील एसी लोकल मुख्य मार्गावर चालवण्यात येणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर हार्बर मार्गावरील एसी लोकल बंद होऊ शकतात.
ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावर वातानुकूलित फेऱ्यांना प्रवासी प्रतिसाद नसल्याने या मार्गावरील लोकल फेऱ्या बंद करण्यात आल्या. सीएसएमटी ते पनवेल, गोरेगावदरम्यानच्या ३२ वातानुकूलित लोकल फेऱ्यांपैकी १६ फेऱ्या बंद करून त्याऐवजी सामान्य फेऱ्या चालवण्यास सुरुवात केली. मे अखेर किंवा जूनमध्ये नवीन वातानुकूलित गाड्या येणार आहेत. त्यानंतर हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल, अशी सावध भूमिका रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतली आहे.
एसी लोकलवरील प्रवाशांची संख्या ( १ ते ८ मे)
एकूण प्रवासी संख्या : २८ हजार १४१
मुख्य मार्ग : २४ हजार ८४२
हार्बर मार्ग : ३ हजार २९९
(ns 105 harbour line)