मुंबई : पैशांसाठी चोरीच्या मोबाईलसह वाहन गहाण ठेवणाऱ्या एका सराईत आरोपीस एमएचबी पोलिसांनी अटक केली. नबी आलम उस्मान खान असे या आरोपीचे नाव असून, तो मूळचा गुजरातच्या सुरतचा रहिवाशी आहे. त्याच्याविरुद्ध सातहून अधिक गुन्ह्यांची नोंद असून, त्याच्या अटकेने तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. दुर्गेश सदन यादव हा रिक्षाचालक असून, त्याने १२ जूनला त्याच्या मालकीची रिक्षा बोविलीतील शिवाजीनगर, शबनम इमारतीजवळ पार्क केली होती. रात्री ही रिक्षा अज्ञात चोरट्याने चोरी केली होती. दुसऱ्या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच त्याने एमएचबी पोलिसांत रिक्षा चोरीची तक्रार केली होती.
याप्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. तपासादरम्यान पोलिसांना ही रिक्षा चेंबूर येथील एका मनी ट्रान्स्फर कार्यालयाबाहेर उभी असल्याचे दिसून आले. तिथे जाऊन चौकशी केली असता, मालकाने ती रिक्षा एका व्यक्तीने गहाण ठेवून दहा हजार रुपये घेतले होते. ही रक्कम त्याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आले होते. या माहितीनंतर पोलिसांनी दुकानातील सीसीटिव्ही फुटेजवरुन आरोपीचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना मोबाईल सीडीआरच्या माध्यमातून पोलिसांनी मिरारोड येथील काशिगावात नबी आलम खान याला पत्त्यांचा जुगार खेळताना शिताफीने ताब्यात घेतले.