
मुंबई : पावणेतेरा लाख रुपयांच्या भाड्याने घेतलेल्या ८५ लॅपटॉपची विक्री करुन एका व्यावसायिकाची फसवणुक केल्याप्रकरणी मनोज श्यामनारायण गौड या आरोपीस अंधेरी पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो पोलीस कोठडीत असून त्याच्याविरुद्ध अशाच अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. अंधेरी येथे एक खाजगी कंपनी असून याच कंपनीत हरभजनसिंग सेठी हे संचालक म्हणून काम करतात. त्यांची कंपनी विविध कंपन्यांना भाड्याने लॅपटॉप देण्याचे काम करते. गेल्या वर्षी त्यांनी आयटी कंपनीचा मालक असलेल्या मनोज गौड याच्या कंपनीसाठी ८५ लॅपटॉप भाड्याने दिले होते. या लॅपटॉपचे दरमाह भाडे दोन लाख सहा हजार रुपये ठरले होते. यावेळी त्यांच्याकडून पाच महिन्यांचे भाड्याचे धनादेश आणि सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून पावणेतेरा लाखांचा एक स्वतंत्र धनादेश घेण्यात आला होता. एक लाखांचा पेमेंट केल्यांनतर मनोजने त्यांना उर्वरित पेमेंट दिले नाही. याच दरम्यान हरभजनसिंग यांच्याकडे काही लॅपटॉप विक्रीसाठी आले होते. त्यातील बहुतांश लॅपटॉप त्यांनी मनोज गौडच्या आयटी कंपनीला भाड्याने दिल्यापैकी होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याची चौकशी सुरु केली होती. या चौकशीत मनोजने ते लॅपटॉप जुबेर चौधरी या व्यक्तीला परस्पर विक्री केले होते. त्यानंतर जुबेरने या लॅपटॉपची विक्रीसाठी जाहिरात केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मनोज गौडविरुद्ध तक्रार केली होती. भाड्याने घेतलेल्या लॅपटॉपची परस्पर विक्री करुन एका व्यावसायिकाची फसवणुक केल्याप्रकरणी मनोज गौडविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. काही दिवसांपूर्वीच मनोजला दिल्लीतून गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली होती. तपासात त्याच्याविरुद्ध अशाच प्रकारच्या गुन्हे असल्याचे उघडकीस आले होते. त्याच्याविरुद्ध शिवाजी पार्कसह अंधेरी, जोगेश्वरी आणि वनराई पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. या चारही गुन्ह्यांत त्याने १ कोटी ४२ लाख रुपयांचे ४४२ लॅपटॉपसह मॉनिटर भाड्याने घेतले होते. या लॅपटॉपची नंतर त्याने परस्पर विक्री करुन संबंधित व्यावसायिकाची फसवणुक केली होती. त्याच्या अटकेने आणखीन तीन ते चार गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.