
शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या आमदारांपाठोपाठ आता खासदारांवर कारवाई सुरू झाली आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांची शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यासह शिवसेनेची जिल्हा कार्यकारिणीही बरखास्त करत एक जिल्हाप्रमुख, दोन उपजिल्हाप्रमुख, तीन तालुका प्रमुखांनाही पक्षातून काढण्यात आले आहे. बंडखोर खासदार प्रताप जाधव यांचे निकटवर्तीय असलेले दोन आमदार आधीच शिंदे गटात दाखल झाले होते. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख तथा खासदार प्रतापराव जाधव यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामधून जाहीर करण्यात आले आहे. जाधव हे शिंदे गटात सामील झाल्याने पक्षविरोधी कारवाया करत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यावरून जाधव यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. जाधव यांच्या जागेवर वसंतराव भोजने यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा संपर्कप्रमुख खासदार प्रतापराव जाधव, जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, उपजिल्हाप्रमुख राजू मिरगे, उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे, तालुकाप्रमुख नांदुरा संतोष डिवरे, तालुकाप्रमुख मलकापूर विजय साठे, तालुकाप्रमुख शेगाव रामा थारकार यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.