अभिनेता रणवीर सिंगची तब्बल दोन तास कसून चौकशी

न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी रणवीर सिंगच्या विरोधात चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता
अभिनेता रणवीर सिंगची तब्बल दोन तास कसून चौकशी

अभिनेता रणवीर सिंग न्यूड फोटोशूट प्रकरणावरून कायम चर्चेत असून त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रणवीर सिंगविरोधात भादंवि कलम २९२, २९३, ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर त्याला दोन वेळा पोलिसांनी समन्स बजावले होते. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी सोमवारी त्याचा जबाब नोंदवत तब्बल दोन तास कसून चौकशी केली.

न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी रणवीर सिंगच्या विरोधात चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी त्याला बजावली होती; पण कामात व्यस्त असल्याचे कारण देत त्याने चौकशीसाठी हजर राहू शकत नाही, असे सांगितले होते. त्यासोबतच त्याने दोन आठवड्यांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणीही चेंबूर पोलिसांकडे केली होती. यानंतर सोमवारी रणवीरने चेंबूर पोलीस ठाण्यात हजेरी लावली.

रणवीर सिंग सकाळीच त्याच्या कायदेपंडितांसह हजर झाला. त्यांच्या उपस्थितीतच रणवीर सिंगचा जबाब नोंदवण्यात आला. यानंतर तब्बल दोन तासाच्या चौकशीनंतर पोलिसांनी रणवीरला जाण्यास परवानगी दिली; मात्र यापुढे याप्रकरणी पोलीस चौकशीसाठी सहकार्य करावे, अशा सूचना त्याला करण्यात आल्या आहेत.दरम्यान, रणवीरने ‘बर्ट रेनॉल्ड’च्या सन्मानार्थ पेपर मासिकासाठी हे फोटोशूट केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in