मुंबई : महात्मा गांधी यांनी ९ ऑगस्ट १९४२ मध्ये ‘चले जाव’चा नारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर धारावीतील राजकीय पक्षांनी ‘अदानी गो बॅक’चा नारा दिला. धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला या सर्वपक्षीयांनी विरोध केला.
राज्य सरकारने अदानी प्रॉपर्टीजला हा संपूर्ण प्रकल्प दिल्याने स्थानिक नागरिक व स्थानिक राजकीय नेत्यांनी विरोध सुरू केला आहे. ‘धारावी बचाओ आंदोलन’च्या झेंडयाखाली सर्वपक्षीयांनी विरोधी केला.
युवा जन मंचाचे रमाकांत गुप्ता म्हणाले की, भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांनी हा प्रकल्प अदानी प्रॉपर्टीजला दिला. जनतेशी कोणताही संवाद न साधता हा प्रकल्प राबवला जात आहे.
आम्ही ४०५ चौरस फूट घराची मागणी केली आहे. तसेच पुन्हा नव्याने सर्व्हेक्षणाची मागणी केली. कारण अखेरचा सर्व्हे २००७ मध्ये झाला होता. आता लोकसंख्येत मोठा फरक पडला आहे, असे शिवसेनेचे माजी आमदार बाबूराव माने यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पाचा मास्टरप्लान अजूनही जनतेला दिलेला नाही. त्यांचे पुनर्वसन कसे करणार याबाबत रहिवासी अनभिज्ञ आहेत. या रहिवाशांनी १७ सूत्री मागण्या केल्या आहेत.