मुंबई : ॲड. सदावर्तेंना बुधवारपर्यंत कोठडी

मुंबई : ॲड. सदावर्तेंना बुधवारपर्यंत कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यात एसटी कर्मचाऱ्यांनी घुसण्याचा प्रयत्न करून दगडफेक केल्याप्रकरणी अटकेत असलेले ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत १३ एप्रिलपर्यंत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस तपासात एक धक्कादायक माहिती उघडकीस आली असून, सदावर्ते यांना हल्ल्यापूर्वी नागपूर येथून काही कॉल आले होते. त्यामुळे हल्ल्यामागील नागपूर कनेक्शनचा आता पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सोमवारी गिरगाव न्यायालयात सांगितले. विशेष म्हणजे, या कॉलचा आधार घेऊन सरकारी वकिलांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती.

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरील हल्ल्यानंतर गावदेवी पोलिसांनी संबंधित एसटी कर्मचाऱ्यांसह इतर आरोपींविरुद्ध दंगलीसह अन्य भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह १०९ एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर या सर्वांना शनिवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. या संपूर्ण कटात सदावर्ते यांची मुख्य भूमिका असल्याने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, तर इतर सर्व एसटी कर्मचाऱ्यांना चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले होते.

सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना पोलीस बंदोबस्तात गिरगाव कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीची मागणी करताना संबंधित आंदोलन पूर्वनियोजित कटाचा एक भाग होता. हल्ल्यापूर्वी एक बैठक घेण्यात आली होती. त्यात एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकावून सिल्व्हर ओक बंगल्यात हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता. त्यासाठी ‘सावधान शरद पवार सावधान’ असे काही बॅनर छापण्यात आले होते. अभिषेक पाटील हा एसटी कर्मचारी ॲड. सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्यानेच हल्ल्याची माहिती काही पत्रकारांना दिली होती. त्यामुळे काही पत्रकार घटनास्थळी दाखल झाले होते. त्यात यूट्यूब चॅनेलसह मराठी चॅनेलचा पत्रकार चंद्रकांत सूर्यवंशी यांचा समावेश होता. हा पत्रकार सतत सदावर्ते यांच्या संपर्कात होता, असे तपासात उघडकीस आले आहे.

या कारवाईनंतर त्याने त्याच्याकडील काही व्हिडीओ डिलीट केले होते. हा पत्रकार व सदावर्ते यांच्यात काही व्हॉटस‌्अॅप चॅट, व्हिडीओ कॉल झाले होते. विशेष म्हणजे हल्ल्यापूर्वी त्यांनी नागपूर शहरातील एका व्यक्तीला कॉल केले होते. त्यांच्यात हल्ल्याविषयी काही महत्त्वाचे संभाषण झाल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. ही व्यक्ती कोण, या हल्ल्यामागे त्याचा काय संबंध होता. त्याने कोणाच्या आदेशावरुन हल्ल्याचे योजना बनविली होती का, याचा आता पोलीस तपास सुरू आहे.

हल्ल्यामागे नागपूर कनेक्शन

या हल्ल्यामागील नागपूर कनेक्शन उघड झाल्याने त्यामागील गांभीर्य वाढले आहे. या व्यक्तीविषयी पोलिसांकडे काही महत्वाचे पुरावे असून योग्य वेळेस ते पुरावे कोर्टात सादर करण्यात येतील, असे सांगण्यात आले. मोहम्मद सादीक शेख या कटातील एक मुख्य आरोपी असून इतर काही आरोपींचीही नावे समोर आली आहेत. या आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे.

काही पत्रकारांचीही चौकशी होणार

दरम्यान, या कटात काही पत्रकारांचे नाव समोर आल्याने आता या पत्रकारांची चौकशी करुन जबानी नोंदविली जाणार आहे.

सदावर्तेच्या गहाळ फोनचा शोध सुरू

ॲड. सदावर्ते यांचा खाजगी फोन असून तो फोन गहाळ झाला आहे. या फोनचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. मार्च महिन्यांपासून मिसिंग असलेला हा फोन सापडल्यास त्यात अनेक धक्कादायक खुलासे होऊ शकतात, असा पोलिसांनी दावा केला आहे. तपासकामी तो फोन आणि सिमकार्ड जप्त करायचे आहे. सदावर्ते नागपूरमधील कोणाच्या संपर्कात होते, हल्ल्याच्या दिवशी सकाळी ते सतत संबंधित व्यक्तीच्या संपर्कात होते. पावणेदोन वाजता पत्रकारांना सिल्व्हर ओक बंगल्यावर पाठवा, असा मेसेज पाठविण्यात आला होता, असेही सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद करताना सांगितले व सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत अकरा दिवसांची वाढ मिळावी, अशी मागणी केली.

सदावर्ते यांनी आंदोलकांकडून १.८० कोटी रुपये जमवले

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी आंदोलकांकडून तब्बल पावणेदोन कोटी रुपये जमवल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या पाच महिन्यांच्या काळात सदावर्ते यांनी प्रत्येक एसटी कर्मचाऱ्यांकडून ५३० रुपयांप्रमाणे १.८० कोटी रुपये गोळा केले. हे सर्व पैसे सदावर्ते यांच्याकडेच जमा करण्यात आले होते, अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.

Related Stories

No stories found.