
येत्या दोन वर्षांत गिरणी कामगारांना मुंबई महानगर क्षेत्रात तीनशे ते साडेतीनशे क्षेत्रफळाची ७५ हजार घरे परवडणाऱ्या दरात देण्यात येणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी केली.
गिरणी कामगारांच्या घरांच्या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. गिरणी कामगारांना देण्यात येणारी घरे तयार असून या घरांची कामगार संघटनांनी पाहणी केल्यानंतर घरांच्या किंमती कामगार संघटनाना विश्वासात घेऊन ठरविण्यात येतील, असे आव्हाड यांनी यावेळी सांगितले. कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना ही घरे पहाण्यासाठी येत्या काही दिवसांत म्हाडाने व्यवस्था करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिले.
गिरणी कामगारांच्या या घरांचा प्रस्ताव व ही बैठक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सुचनेनुसार आयोजित केली आहे. गिरणी कामगारांना लवकरात लवकर घरे मिळावी व हा प्रश्न लवकरात मार्गी लागावा म्हणून हा प्रस्ताव तयार केल्याचे यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला कृती संघटनेच्या जयश्री खाडीलकर-पांडे, जयप्रकाश भिलारे, प्रविण घाग, निवृत्ती देसाई, नंदू पारकर, बजरंग चव्हाण, प्रविण येरुणकर, हेमंत गोसावी व सर्व श्रमिक संघटनेचे उदय भट. बी. के. आम्ब्रे, संतोष मोरे, निवारा संघटनेचे हेमंत राऊळ उपस्थित होते.