पावसाची महिन्याभरानंतर पुन्हा एण्ट्री रस्ते वाहतूक मंदावली ; येत्या आठवडाभर कोसळण्याचा अंदाज

सतत बरसणाऱ्या पावसामुळे गोविंदांचा काहीसा हिरमोड झाला
पावसाची महिन्याभरानंतर पुन्हा एण्ट्री रस्ते वाहतूक मंदावली ; येत्या आठवडाभर कोसळण्याचा अंदाज

मुंबई : संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर जवळपास महिन्याभरानंतर सप्टेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात पावसाची पुन्हा एकदा एण्ट्री झाली. गुरुवारी सकाळपासून पावसाने मुंबईसह परिसरात बॅटिंगला सुरुवात केली. दहीहंडी उत्सव, त्यात पावसाची हजेरी यामुळे गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचला, तर गरमीमुळे हैराण झालेला मुंबईकर काहीसा सुखावला. गुरुवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने रस्ते वाहतूक मंदावली होती. दरम्यान, गुरुवारी बरसलेल्या पावसाचा जोर शुक्रवारी कायम असेल, तर पुढील एक आठवडा पावसाच्या सरीवर सरी बरसण्याची शक्यता आहे, असा अंदाज मुंबई हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी व्यक्त केला.

यंदा संपूर्ण जून महिना कोरडा गेला. जुलैच्या १५ दिवसांत वरुणराजाची समाधानकारक इनिंग झाली, मात्र ऑगस्टमध्ये पावसाने महिनाभर दडी मारल्याने मुंबईत चिंतेचे ढग दाटून आले. मात्र हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. गुरुवारी दहीहंडीची सुट्टी असली तरी मडकी फोडणाऱ्या गोविंदांचा थरार अनुभवण्यासाठी मुंबईकरांची तोबा गर्दी रस्तोरस्ती झाली होती. सतत बरसणाऱ्या पावसामुळे गोविंदांचा काहीसा हिरमोड झाला. तरीही पावसाचा आनंद घेत गोविंदा पथकांनी सकाळपासून मटकी फोडण्यासाठी ठिकठिकाणी कूच केली.

११ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या

गुरुवारी सकाळपासून बरसणाऱ्या पावसामुळे मुंबई पूर्व उपनगरात ४, तर पश्चिम उपनगरात ७ अशा ११ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

पावसाची नोंद -

शहर - ५७. ६३ मिमी

पूर्व उपनगर - ७६.९४ मिमी

पश्चिम उपनगर - ९०.५० मिमी

येथे सर्वाधिक पावसाची नोंद -

गोवंडी - १५० मिमी

मालवणी - ११७ मिमी

मरोल - ११५ मिमी

अंधेरी - १०४ मिमी

चिंचोली - १०३ मिमी

गोरेगाव - ९८ मिमी

वांद्रे - पार्ले - ९३ मिमी

सांताक्रुझ - ९२ मिमी

विक्रोळी - ९६ मिमी

रावली कॅम्प - ९० मिमी

logo
marathi.freepressjournal.in