
औरंगाबादच्या सभेनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह सभेचे आयोजन करणाऱ्या राजीव जावळीकर यांच्यावर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदविला आहे. सभेसाठी औरंगाबाद पोलिसांकडून काही अटी आणि नियम घालण्यात आले होते, मात्र, या सर्व नियमांचे उल्लघंन झाल्याचे उघडकीस आल्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राज ठाकरेंच्या सभेचे व्हिडीओ पाहिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
यासंदर्भात सिटीचौक पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानान इंगळे यांनी फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार राज ठाकरे, राजीव जावळीकर व इतर आयोजकांविरोधात १२७/२०२२ कलम ११६,११७,१५३ भादंवि १९७३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ सुधारीत ३१ जुलै २०१७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सिटी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी हे करत आहेत.
राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत बोलताना मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ४ मे रोजीचा अल्टिमेटम दिलेला आहे. भोंगे काढले गेले नाहीत तर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता मनसे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.