मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संप मागे ?

रात्री उशिरापर्यंत कामगारांमध्ये गोंधळाचे वातावरण
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संप मागे ?

मुंबई : बुधवार २ ऑगस्टपासून बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संप पुकारला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री उशिरा कंत्राटी कामगारांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आणि मागण्या मान्य केल्याचे सांगितले, असे कंत्राटी कामगारांचे म्हणणे आहे. मात्र संपात सहभागी झालेल्या कंत्राटी कामगारांना संप मागे घेतल्याचे कुठलेही ठोस आश्वासन मिळाले नसल्याने त्यांच्यात गोंधळाचे वातावरण पसरले. दरम्यान, जोपर्यंत २७ बस आगारातील कंत्राटी कामगार बुधवारी सेवेत रुजू होत नाही तोपर्यंत काहीही सांगणे शक्य नाही, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

बसेसचा पुरवठा करणाऱ्या डागा ग्रुप, हंसा, मातेश्वरी, टाटा, ओलेक्ट्रा, स्विच मोबॅलिटी या कंपन्यांतील कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी बुधवार २ ऑगस्टपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले. संपकऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल झाले. आझाद मैदान येथे उपोषणावर बसलेले कंत्राटी कामगार लेखी आश्वासनावर ठाम असल्याने संप चिघळत गेला. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी रात्री उशिरा कंत्राटी कामगारांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आणि मागण्या मान्य केल्याचे आश्वासन दिल्याचे कंत्राटी कामगारांचे म्हणणे आहे. मात्र लेखी आश्वासन दिल्याचे पत्र कुठे अशी विचारणा कंत्राटी कामगारांकडून होत असून रात्री उशिरापर्यंत कंत्राटी कामगारांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले आहे.

‘एसटी’, स्कूल बस, कायम कर्मचारी मैदानात

‘बेस्ट’चे सुमारे ९०० कंत्राटी कामगार संपावर गेल्याने मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने अतिरिक्त ठरलेल्या आणि सध्या इतर विभागात काम करणार्‍या सुमारे ८०० कर्मचाऱ्यांना ड्युटीवर बोलावले आहे.

काम बंद आंदोलनामुळे १३७१ पैकी संध्याकाळपर्यंत सुमारे ३५० गाड्या आगारात उभ्या राहिल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली. तर प्रवाशांच्या सेवेसाठी एकूण २१० एसटी बस चालवल्या.

तसेच एसटी चे ३५ बस चालक बेस्ट उपक्रमाच्या बस गाड्यांवर कार्यरत होते. या व्यतिरिक्त १०० शाळेच्या बस गाड्या बेस्ट मार्गावर प्रवर्तित करण्यात आल्या आहे.

या आहेत प्रमुख मागण्या

‘बेस्ट’मध्ये वाहतूक सेवा पुरवण्यासाठी डागा ग्रुप, हंसा, मातेश्वरी, टाटा, ओलेक्ट्रा, स्विच मोबॅलिटी या कंपनीत चार वर्षांपूर्वी चालक म्हणून सेवेत रुजू होताना करारात २२५०० रुपये वेतन देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

मात्र प्रत्यक्षात १७ हजार रुपये पगार हातात मिळतो. साप्ताहिक सुट्टी वेळेत मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची फसवणूक होत आहे. ३० दिवसांपैकी २६ दिवस कामावर हजर रहावे लागते. नादुरुस्त बसेस चालवाव्यात लागतात, असे कामगारांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in