राज्यसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीत "संशयकल्लोळचा" प्रयोग रंगला

येत्या २० जून रोजी १० जागांसाठी विधान परिषदेच्या निवडणुका होणार
राज्यसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीत "संशयकल्लोळचा" प्रयोग रंगला

राज्यसभेत भाजपने बाजी मारल्यापासून शिवसेना खचली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने राज्य विधान परिषदेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीत आणखी अडचणी निर्माण होऊ नयेत, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांसोबत प्रत्यक्ष बैठका घ्याव्यात, असा आग्रह धरला आहे. येत्या २० जून रोजी १० जागांसाठी विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत.

शिवसेनेच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, शिवसेनेला राष्ट्रवादी व काँग्रेसशी चांगल्या समन्वयाची अपेक्षा आहे. विधान परिषदेच्या येत्या निवडणुकीत तीन पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या आमदारांची काळजी घ्यावी. शिवसेनेचे ५५ आमदार आहेत. ते दोन उमेदवार सहजपणे निवडून आणू शकतात. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ५१ आमदार व अपक्षांच्या मदतीने तेही त्यांचे दोन आमदार निवडून आणू शकतात. तर काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. त्यांना त्यांचे दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी दोन मित्रपक्षांची, अपक्षांची व छोट्या पक्षांची मदत लागेल.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी २५.९१ मतांचा कोटा आहे. राज्य विधिमंडळात या तिन्ही पक्षांची संख्या १८५ आहे; मात्र शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाले आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक व अनिल देशमुख हे तुरुंगात आहेत. त्यामुळे त्यांचे समीकरण बदलू शकते.

शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्र्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी एकजूट दाखवली पाहिजे. भाजपचा मुकाबला करायचा असल्यास त्यांनी धोरण आखले पाहिजे. अपक्ष आमदारांच्या अडचणी व छोट्या पक्षांच्या आमदारांचे प्रश्न शिवसेनेने सोडवले पाहिजेत. तसेच राष्ट्रवादी व कँग्रेसने सर्व जबाबदारी सेनेवर ढकलू नये. त्यांनीही या निवडणुकीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

अपक्षांना आपल्या बाजूने करण्याचा ‘चमत्कार’ केल्याबद्दल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी कँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार यांनी स्तुतीसुमने उधळली आहे. फडणवीसांचे कौतूक केल्याचे शिवसेनेला पसंद पडलेले नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in