मुंबई : नरिमन पॉईंट येथील अतिशय मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या आणि मरीन ड्राईव्ह तसेच मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याचे जेथून अतिशय विलोभनीय दृश्य दिसते, अशा एअर इंडियाच्या इमारतीची खरेदी महाराष्ट्र शासन करणार आहे. १९७४ साली बांधण्यात आलेल्या या इमारतीची राज्य सरकार १६०१ कोटी रुपयांना खरेदी करणार आहे. त्यासाठी एअर इंडियाचे सर्व बुडित उत्पन्न व अन्य दंड माफ करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या इमारतीत राज्य सरकारचीच अनेक कार्यालये जी सध्या विखुरलेली आहेत, ती सुरू करता येतील.
नरिमन पॉईंट येथील अतिशय मोक्याच्या ठिकाणी ही इमारत आहे. तसेच राज्य शासनाचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयापासून ही इमारत अगदी हाकेच्या अंतरावर आहे. २०१३ सालापर्यंत या इमारतीत एअर इंडियाचे मुख्यालय होते. मात्र ते नंतर दिल्लीला हलवण्यात आले. मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर अनेक महत्त्वाचे विभाग मंत्रालयापासून दूर विखुरलेले आहेत. आरोग्य, वैदयकीय, शिक्षणसारखे महत्त्वाचे विभाग हे सध्या जीटी रूग्णालयातून चालवण्यात येत आहेत. अशा विभागांच्या भाड्यापोटी राज्य सरकारला २०० कोटींचा खर्च करावा लागतो. ही इमारत ताब्यात आल्यानंतर तो खर्च वाचणार आहे. २२ मजली इमारतीत ४६ हजार ४७० चौरस मीटर जागा शासकीय कार्यालयांसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच ही इमारत खरेदी करण्यापूर्वी राज्य शासनास देय असणारे अनर्जित (बुडित) उत्पन्न आणि दंड माफ करण्यात येईल. जेणेकरून ही इमारत लवकर रिकामी करून ताब्यात घेण्यात येईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन एअर इंडियाची इमारत राज्य सरकारलाच देण्याची विनंती केली होती. त्यानुसार एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
दरम्यान, मुंबईत १९९३ साली जेव्हा साखळी बॉम्बस्फोट झाले, तेव्हा त्यातील एक बॉम्ब याच एअर इंडियाच्या इमारतीत फुटला होता. इमारतीच्या बेसमेंटमध्ये झालेल्या या स्फोटात २० जणांचा मृत्यू झाला होता.