मुंबई पालिकेतील कार्यालयावर ताबा मिळवण्यासाठी ठाकरे - शिंदे गट आमनेसामने; सर्वच पक्षांची कार्यालये केली सील

सत्तांतर झाल्यापासून शिवसेना पक्षाची कार्यालये ताब्यात घेण्यासाठी अनेकदा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये वाद निर्माण झाले आहेत
मुंबई पालिकेतील कार्यालयावर ताबा मिळवण्यासाठी ठाकरे - शिंदे गट आमनेसामने; सर्वच पक्षांची कार्यालये केली सील
@ANI

महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षामध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि राज्यात सत्तांतर पाहायला मिळाले. अशामध्ये शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट हे दोन्हीही गट अनेकदा आमनेसामने आले आणि मोठा वादही निर्माण झाला आहे. अशीच घटना २८ डिसेंबरला मुंबई पालिकेतील शिवसेना कार्यालयाबाबतही पाहायला मिळाले. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयात प्रवेश करत ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावरून ठाकरे गटाच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी याचा विरोध केला. दोघांमध्येही एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरु झाली आणि वातावरण चांगलेच तापले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढून बाहेर काढले.

शिंदे गट आणि ठाकरे यांच्यातील राड्यानंतर महापालिका आयुक्तांनी पुढील आदेशापर्यंत सर्वच पक्षांची कार्यालये तात्पुरती सील करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, विविध समितीच्या अध्यक्षांची दालने सुद्धा सील करण्यात आली. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेविका शितल म्हात्रे, माजी आमदार अशोक पाटील, विभाग प्रमुख दिलीप नाईक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिंदे गटाचे हे नेते ताबा घेण्यासाठी आले असल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ, आशिष चेंबूरकर, माजी नगरसेवक सचिन पडवळ, रमाकांत रहाटे, सदानंद परब आदींनी पक्ष कार्यालयात धाव घेतली. वातावरण तापले असताना आझाद मैदान पोलिसांनी मध्यस्ती करत वातावरण शांत केले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in