बिन'शर्ट' पाठिंब्यावरून ज्यूनियर ठाकरे आमने-सामने, अमित ठाकरे-आदित्य ठाकरेंच्यात जुंपली...

काही जणांना फक्त उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिन'शर्ट' पाठिंबा दिला, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर मनसेकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.
बिन'शर्ट' पाठिंब्यावरून ज्यूनियर ठाकरे आमने-सामने, अमित ठाकरे-आदित्य ठाकरेंच्यात जुंपली...

मुंबई: बिनशर्त पाठिंब्यावरून आता आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आमनेसामने आले आहेत. शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी बिनशर्त पाठिंब्यावरून राज ठाकरेंवर नाव न घेता टीका केली होती. काही जणांना फक्त उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिन'शर्ट' पाठिंबा दिला, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर मनसेकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला, त्यावर आदित्य ठाकरेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते अमित ठाकरे?

अमित ठाकरेंनी आदित्य ठाकरेंवर टीका करताना म्हटलं होतं की, २०१९ विधानसभा निवडणुकीत मनसेने वरळीत आदित्य ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर आदित्य हे विधानसभेत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. मात्र गेल्या पाच वर्षात त्यांनी या मतदार संघात काहीच केले नाही. गेल्या पाच वर्षात काही करता आले नाही. ते तीन महिन्यात काय करणार? ते मतदार संघात फिरलेही नाहीत. कोळी वाड्याचे प्रश्न आजही तसेच आहे. या साठी बिनशर्त पाठिंबा दिला नव्हता."

आदित्य ठाकरेंचं चोख प्रत्यत्तर-

आदित्य ठाकरेंनी अमित ठाकरेंच्या टिकेला उत्तर देताना म्हटलं की, "सुपारीबाज पक्षावर अधिक बोलण्याची गरज नाही. निवडणुका आल्या की हे पक्ष उगवतात. मते खाण्याची त्यांची कामे आहेत. मला पराभूत करायचं असेल तर बिनशर्त वाल्यानी शर्ट घालून यावे. निवडणुका आल्या की ते स्टंटबाजी करतात."

शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंनी केली होती टीका-

शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी बिनशर्त पाठिंब्यावरून राज ठाकरेंना टोला लगावला. ते म्हणाले की,"एक गोष्ट बरी झाली. या निवडणूकीमुळं आपले कोण आणि परके कोण हे स्पष्ट झालं. काही जणांना फक्त उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिनशर्ट पाठिंबा दिला. अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट ना? आम्ही नाटकं करणारी माणसं नाही. ती कला मोदींना जमते, आम्हाला नाही. महाराष्ट्रातील निवडणूक पाच टप्प्यात नाही, दहा टप्प्यात व्हायला पाहिजे होती. रोज यांचे सालटी काढली असतं मी."

logo
marathi.freepressjournal.in