
पोटच्या ११ वर्षांच्या मुलाला दोन वर्षांपासून तब्बल २२ कुत्र्यांसोबत एका रूममध्ये डांबून ठेवल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ कुत्र्याच्या पिलांच्या सहवासात बंदिस्त राहिल्यामुळे हा मुलगा माणूस असल्याचेच विसरून गेला आहे. याप्रकरणी आई-वडिलांविरोधात बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम सन २०० चे कलम २३, २८ अंतर्गत कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कोंढवा परिसरातील कृष्णाई इमारतीमध्ये संजय लोधरिया आणि शितल लोधरिया राहतात. त्यांच्या घरात २० ते २२ कुत्री आहेत. त्या घरातून खूप वास येत आहे. कुत्री असलेल्या खोलीत ११ वर्षांचा मुलगा जवळपास दोन वर्षापासून राहत आहे. तो मुलगा खिडकीत बसतो आणि कुत्र्यांसारखे वर्तन करतो,’ अशी माहिती चाईल्ड लाईन संस्थेच्या समन्वयक अपर्णा मोडक यांना अज्ञाताने फोनवरून दिली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली. तेव्हा एका रुममध्ये ११ वर्षाचा मुलगा होता आणि त्याच्या आजूबाजूला विविध वयोगटाची २० ते २२ कुत्री आढळून आली. तो मुलगा बेडवर झोपलेल्या अवस्थेत होता.
त्यावेळेस अपर्णा मोडक यांनी मुलाच्या आई-वडिलांना अशाप्रकारे मुलाला ठेवल्यास त्याच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो, असे सांगत मुलाच्या आरोग्याबाबत जनजागृती केली आणि त्या निघून गेल्या. मात्र, काही दिवसांनी जाऊन पाहिले असता परत तोच प्रकार दिसून आला. त्यानंतर मोडक यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपी वडील आणि आई यांची चौकशी सुरू आहे. तसेच त्या मुलाचे समुपदेशन करण्यात येत असल्याचे कोंढवा पोलिसांनी सांगितले. मुलाच्या पालकांनी कुत्र्यांना घरात ठेवण्याची परवानगी घेतली होती का, याचा तपास पोलीस करत असून बालकल्याण समितीच्या निर्णयानंतर या जोडप्याला अटक केली जाणार आहे. मुलासोबत घरातून रेस्क्यू केलेल्या कुत्र्यांना डॉग शेल्टरमध्ये नेण्यासाठी पोलिसांनी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला आहे.