बोगस पासपोर्टवर विदेशात जाण्याचा प्रयत्न फसला ; आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन प्रवाशांना अटक

चौकशीत या दोघांनी जन्माचे बोगस दस्तावेज सादर करून कोलकाता येथील कार्यालयातून पासपोर्ट मिळविले होते
बोगस पासपोर्टवर विदेशात जाण्याचा प्रयत्न फसला ; आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन प्रवाशांना अटक

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या तीन प्रवाशांना सहार पोलिसांनी अटक केली. बोगस पासपोर्टवर विदेशात जाण्याचा या तिघांचा प्रयत्न इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी हाणून पाडला. अटकेनंतर या तिघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सैद सलीम स्वपन शेख, नूरसालेम शेख इहाबअली, कोंडास्वामी अगैया तम्मीचेट्टी अशी या तिघांची नावे आहेत. सैद सलीम, नूरसालेम हे दोघेही कोलकाता तर कोंडास्वामी हा हैदराबादचा रहिवासी आहे. तीन दिवसांपूर्वी ते तिघेही आंतरराष्ट्रीय विमातळावर दुबई, शारजा आणि मस्कतला जाण्यासाठी आले होते. यावेळी पासपोर्टवरील जन्मतारखेबाबत संशय निर्माण झाल्याने सैद सलीम आणि नूरसालेम या दोघांना इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत या दोघांनी जन्माचे बोगस दस्तावेज सादर करून कोलकाता येथील कार्यालयातून पासपोर्ट मिळविले होते. याच पासपोर्टवर ते दोघेही विदेशात जाण्यासाठी आले होते. तिसऱ्या घटनेत कोंडास्वामी या प्रवाशाला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. कोंडास्वामी यापूर्वी शारजाला गेला असून त्याला ब्लॅक लिस्ट करून भारतात पाठविण्यात आले होते. त्यामुळे त्याने गेल्या वर्षी हैदराबाद येथून दुसरा पासपोर्ट मिळविले होता. यावेळी त्याने सादर केलेले सर्व दस्तावेज बोगस होते. याच पासपोर्टवर तो पुन्हा शारजाला गेला होता. मात्र त्याला शारजात प्रवेश बंदी असल्याने पुन्हा मुंबईत डिपोर्ट करण्यात आले होते. बोगस दस्तावेजच्या आधारे पासपोर्ट बनवून शारजाला जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला सहार पोलिसांनी अटक केली.

logo
marathi.freepressjournal.in