
मुंबई : रॉबरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या तीन अज्ञात चोरट्याने एका वयोवृद्ध जोडप्यावर हल्ला करून घरातील लाखो रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला. या हल्ल्यात सुरेखा मदन अग्रवाल या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी मारहाणीसह रॉबरी आणि हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू केला आहे. रविवारी सकाळी घडलेल्या या रॉबरीसह हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.
मदन मोहन अग्रवाल हे त्यांची पत्नी सुरेखा यांच्यासोबत ताडदेव येथील यमाबाई काशिनाथ रोडवरील युसूफ मंझिल इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहतात. रविवारी सकाळी साडेपाच वाजता मदन अग्रवाल हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी जात असताना तिथे दबा धरुन बसलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांना पकडून त्यांच्या घरी आणले. त्यांच्यासह त्यांच्या पत्नीचे हातपाय बांधून आणि तोंडाला सेलोटेप लावून त्यांच्या अंगावरील दागिने तसेच कपाटातील दागिने आणि कॅश घेऊन तेथून पलायन केले. त्यापूर्वी या तिघांनी त्यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. काही वेळानंतर मदन यांनी स्वत:ची सुटका करून स्थानिक रहिवाशांना ही माहिती दिली. या रहिवाशांकडून ही माहिती मिळताच ताडदेव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
पत्नी बेशुद्धावस्थेत असल्याने तिला तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. सुरेखा यांच्या तोंडाला सेलोटेप लावल्याने त्यांचे नाक झाकले गेले होते. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यात अडचणी येत होत्या. त्यातून त्या बेशुद्ध झाल्या. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्यांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. घरातून किती रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे. दरम्यान या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले आहेत.