अभियंता हा पृथ्वीतलावरचा दुसरा निर्माता

डॉ. श्रीपाल सबनीस यांच्याकडून गौरवोद्गार
अभियंता हा पृथ्वीतलावरचा दुसरा निर्माता

मुंबई : ईश्वर हा निसर्गाचा पहिला निर्माता आहे, तर अभियंता हा पृथ्वीचा दुसरा निर्माता आहे, असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी काढले.

वसंतदादा पाटील शिक्षण प्रतिष्ठान मुंबई, म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन आणि पुणे येथील विकासकर्मी अभियंता मित्र मासिक यांच्या संयुक्त विद्यमाने जगप्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांचा वाढदिवस आणि अभियंता मित्र मासिकाचा वर्धापनदिन मुंबईतील वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार काटकर आणि प्रतिष्ठानचे महासचिव ॲॅड. आप्पासाहेब देसाई, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झालेले सचिव शरद सबनीस, मुंबई महापालिकेचे उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांदळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. “केवळ अभियंत्यांकडूनच स्वच्छ आणि शुद्ध तसेच भ्रष्टाचारविना चारित्र्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. समाजातील प्रत्येक घटकांने शुद्ध आणि स्वच्छ असावे, यात काहीच गैर नाही. काही अभियंते काम करत असताना चुकत असतील, त्याचे मी समर्थन करणार नाही. पण केवळ सर्वांना एकाच मापाने मोजणे, हे केवळ अन्यायकारक आहे,” असेही सबनीस म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in