राज्‍यातील सत्तासंघर्षावर आज महत्त्वाची सुनावणी होणार; निकालावर शिवसेना, शिंदे गटाचे भवितव्य ठरणार

राज्‍यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत ऐतिहासिक असे बंड केले. सूरत, गोवा व्हाया गुवाहाटी, असा बंडखोर आमदारांचा प्रवास झाला.
राज्‍यातील सत्तासंघर्षावर आज महत्त्वाची सुनावणी होणार; निकालावर शिवसेना, शिंदे गटाचे भवितव्य ठरणार

राज्‍यात शिंदे-फडणवीस सरकार स्‍थापन होऊन दीड महिना उलटला आहे. मंत्रिमंडळाचा विस्‍तारही पार पडला आहे; मात्र सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी बाकी आहे. सोमवार, दि. २२ ऑगस्‍ट रोजी राज्‍यातील सत्तासंघर्षावर महत्त्वाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. न्यायालय निकाल देणार की, हे प्रकरण घटनापीठाकडे सोपविणार, हे पाहावे लागणार आहे. शिवसेना तसेच शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य ठरविणाऱ्या या सुनावणीकडे संपूर्ण राज्‍याचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्‍यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत ऐतिहासिक असे बंड केले. सूरत, गोवा व्हाया गुवाहाटी, असा बंडखोर आमदारांचा प्रवास झाला. राज्‍यात आल्‍यानंतर मुख्यमंत्रिपदाची माळही एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली; मात्र दरम्‍यानच्या काळात राज्‍यातला हा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेला. सुरुवातीला आमदारांच्या अपात्रतेवरून सुरू झालेली लढाई आता मूळ शिवसेना कोणाची, या मुद्द्यावर पोहोचली आहे. शिंदे गट तसेच ठाकरे गट यांनी एकमेकांविरोधात याचिका दाखल केल्‍या आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्‍बल, अभिषेक मनू सिंघवी हे तर शिंदे गटाकडून हरिष साळवे बाजू मांडत आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत विधिमंडळाने बंडखोर तसेच शिवसेनेच्या आमदारांवर कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. शिंदे गटाने शिवसेनेच्या धनुष्‍यबाण या निवडणूक चिन्हावरही दावा केला आहे. त्‍याची केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे.

शिवसेनेने तातडीने सुनावणी घ्‍यावी, अशी मागणी केली होती; मात्र सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी वेळापत्रकात ठरल्‍यानुसार २२ ऑगस्‍ट रोजीच सुनावणी होईल, असे स्‍पष्‍ट केले होते. शिवसेनेच्या सुभाष देसाई व सुनील प्रभू यांनी विधानसभाध्यक्षांच्या निवडीला आव्हान दिले आहे. बंडखोर आमदारांच्या पाठिंब्‍यावर सरकार स्‍थापन करण्याची परवानगी देण्याच्या राज्‍यपालांच्या निर्णयावरही शिवसेनेने प्रश्नचिन्ह उपस्‍थित केले आहे. उद्धव ठाकरे यांनी सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्‍ती केल्‍यालाही शिंदे गटाने आव्हान दिले आहे. अशा परस्‍परविरोधी आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी होणार आहे.

खंडपीठासमोर सोमवारी होणाऱ्या सुनावणीत शिवसेना कोणाची, यावर काही निकाल येणार काय? हे प्रकरण घटनापीठाकडे सोपविण्यात येणार काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे कदाचित उद्याच्या सुनावणीत मिळू शकतील. राज्‍यातील सत्तासंघर्षावर तसेच शिवसेनेचे आणि राज्‍य सरकारचे भवितव्य ठरविणाऱ्या या अतिशय महत्त्वाच्या सुनावणीवर संपूर्ण महाराष्‍ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

न्यायदेवतेवर विश्वास : उद्धव

“सर्वोच्च न्यायालयात सोमवारी काहीही होवो, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. जनताही माझ्यासोबत आहे. जनता आता वाट बघते आहे की, निवडणुका कधी येतात आणि या गद्दारांना कधी धडा शिकवतो; मात्र त्‍यांच्यात निवडणुका लवकर घेण्याची हिंमत नाही,” असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावले. “विधिमंडळाचे सभागृह हे जनतेचे आशास्थान आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंत्र्यांना सुनावले आहेच; पण उद्या कोणीही, अगदी मुख्यमंत्रीही तसे वागले तर त्‍यांचेही कान उघडण्याचे काम करावे लागेल,” असेही ते म्‍हणाले.

मातोश्री येथे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्‍ते झाले. त्‍यावेळी तसेच नंतर शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे बोलत होते. सर्वोच्च न्यायालयात २२ ऑगस्‍ट रोजी शिवसेना कोणाची, यावर महत्त्वाची सुनावणी आहे. या पार्श्वभूमीवर माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यायालयात जे व्हायचे ते होईल. जनताही आपल्‍यासोबत असल्‍याचे ठाकरे म्‍हणाले.

नीलम गोऱ्हे यांचे कौतुक

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपसभापतीपदाच्या कारकीर्दीची माहिती देणाऱ्या पुस्‍तकाचे उद्धव ठाकरे यांच्याहस्‍ते प्रकाशन झाले. नीलम गोऱ्हे यांच्या कामाचे कौतुक करताना उद्धव ठाकरे म्‍हणाले, “नीलम गोऱ्हे या मूळच्या शिवसैनिक नाहीत. त्‍या वेगळ्या विचारांच्या होत्‍या. एक चळवळीतील महिला कार्यकर्ती अशी त्‍यांची ओळख होती. त्‍या एके दिवशी येऊन मला भेटल्‍या. दुसऱ्या दिवशी त्‍यांनीच आपल्‍याला शिवसेनेत प्रवेश करायचा असल्‍याची इच्छा बोलून दाखवली. आजपर्यंत व भविष्‍यातही त्‍या शिवसेनेसोबत असतील,” असे ठाकरे म्हणाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in