दुर्घटनेला तब्बल ४ वर्षे, तरी अजूनही कामगार रुग्णालय बंद

अद्याप कामगार रुग्णालय खुले ना झाल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली
दुर्घटनेला तब्बल ४ वर्षे, तरी अजूनही कामगार रुग्णालय बंद

१७ डिसेंबर २०१८ रोजी अंधेरीतील राज्य कामगार विमा महामंडळ रुग्णालयमध्ये घडलेल्या दुर्घटनेत १४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेला आज ४ वर्षे पूर्ण झाली. २००९ला या रुग्णालयाच्या नूतनीकरणास सुरुवात झाली होती. मात्र, आत्तापर्यंत २५० कोटी हून अधिक खर्च होऊनसुद्धा आजही या रुग्णालयाला टाळेच आहे. २०१८ मध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर आगामी काही महिन्यात हे रुग्णालय सुरु होईल, अशी अपेक्षा तेथील स्थानिक नागरिकांना होती. पण, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या आजूबाजूच्या भागातील विमाधारकांना आणि रुग्णांना उपचारांसाठी कांदिवली येथे जावे लागते. पण तिथे गेल्यावरही सर्वच उपचार मिळतील, याची अपेक्षा नसते.

कधी रुग्णालयात डॉक्टरांच्या कमतरतेमुळे तर कधी कधी काही मशिन्स बंद पडल्याने अनेक फेऱ्या माराव्या लागतात. काही सिटी स्कॅन, एमआरआयसारख्या करोडो रुपयांच्या मशीन या अंधेरीतील रुग्णालयात धूळ खात पडल्या आहेत. विशेष म्हणजे, कांदिवलीतील रुग्णालयात या मशीन उपलब्ध नाहीत, त्यामुळे दुसऱ्या पालिका रुग्णालयात रुग्णांना धक्के खावे लागतात. यामुळे विमाधारक आणि रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. विमा योजनेच्या एकूण महसूलपैकी सर्वाधिक महसूल हा महाराष्ट्रातून जमा केला जातो. मुंबईतील अंधेरीमधील मरोळ भागात अंदाजे ८ लाखांच्या आसपास लाभार्थी आहेत. गरीब कामगारांच्या पगारातून दरमहा न चुकता विम्याची रक्कम वसुल केली जाते पण त्याबदल्यात त्यांना काय मिळतंय? तर, हे रुग्णालय सुरु होण्यासाठी आणखी किती वाट पाहावी लागणार? असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in