एकनाथ शिंदे गटात आणखी एक शिवसेनेचे आमदार सामील

ज्या पक्षाने आमदार केले, त्या पक्षाला सोडून जाता, बेईमानी करता अशा लोकांचे भले होणार नाही.
एकनाथ शिंदे गटात आणखी एक शिवसेनेचे आमदार सामील

आमदारांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची भाषा करणारे आणि बंडखोर आमदारांनाच खडे बोल सुनावणारे शिवसेनेचे हिंगोलीतील कळमनुरी येथील आमदार संतोष बांगर सोमवारी एकनाथ शिंदे गटात सामील झाले. बहुमत चाचणीवेळी बांगर यांनी शिंदे गटाच्या बाजुने मतदान केल्यानंतर बंडखोर आमदारांनी टाळ्या वाजवून जल्लोषात त्यांचे स्वागत केले. “ज्या पक्षाने आमदार केले, त्या पक्षाला सोडून जाता, बेईमानी करता अशा लोकांचे भले होणार नाही. त्यांच्या बायका त्यांना सोडून जातील. या बेईमानांच्या मुलांना कोणी बायका देणार नाहीत. ते मुंजेच राहतील असे ठणकावून सांगणारे आमदार संतोष बांगर यांनीच ऐनवेळी शिवसेनेला मोठा धक्का दिला. ते विधानसभेत चाचणीवेळी शिंदे गटात दिसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

शिंदेसेनेत सामील झालेले आमदार संतोष बांगर काही दिवसांपूर्वीच शिवसेनेशी एकनिष्ठ राहा, असे सांगून शिवसैनिकांना उभारी देत होते. शिवसैनिकांना बळ, उभारी देण्यासाठी आमदार संतोष बांगर यांनी आपल्या कळमनुरी मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेतला. त्यानंतर काही दिवसांनीच ते शिंदेसेनेत जाऊन बसले. विधानसभाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे सरकारचे उमेदवार राहुल नार्वेकर विजयी झाले. तेव्हा शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात मतदान करणारे बांगर एका रात्रीतच शिंदे गटात सामील झाल्याने ठाकरे यांना मोठा हादरा बसला.

बांगर सामील झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील शिवसेना आमदारांचा आकडा आता ४० वर गेला आहे. बांगर हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच होते. त्यामुळे त्यांचे त्यांच्या मतदारसंघातही जंगी स्वागत करण्यात आले होते, पण त्यांनी भाजप-शिंदे गटाशी संधान साधत शिवसेनेवरची अढळ निष्ठाही सोडली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in