१७ तासांत दुचाकीवरून अष्टविनायक दर्शन; रश्मी परब यांचा इंडिया बुक रेकॉर्ड

गडकिल्ले, उंच शिखर/पर्वत चढून जाणे, दुचाकीने भ्रमंती करणे, फोटोग्राफी करणे अशा प्रकाराचा छंद रश्मी परब यांनी जोपासला आहे.
१७ तासांत दुचाकीवरून अष्टविनायक दर्शन; रश्मी परब यांचा इंडिया बुक रेकॉर्ड
Published on

डोंबिवली : परेल व्हिलेज येथे राहणाऱ्या रश्मी परब या महिलेने दुचाकीवरून १७ तासांत अष्टविनायकचे दर्शन घेण्याचा विक्रम केला आहे. त्यांच्या या विक्रमाची नोंद इंडिया बुक रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

गडकिल्ले, उंच शिखर/पर्वत चढून जाणे, दुचाकीने भ्रमंती करणे, फोटोग्राफी करणे अशा प्रकाराचा छंद रश्मी परब यांनी जोपासला आहे. रश्मी परब या श्री गणेश भक्त आहेत. त्यामुळे परब यांनी दुचाकीने एका दिवसात अष्टविनायकाचे दर्शन घेण्याचा निश्चय केला. पहाटे ५.१० वाजता वरद विनायक मंदिर (महड) येथून दर्शन घेऊन आठही अष्टविनायक मंदिरांचा प्रवास त्यांनी दुचाकीने केला. बल्लाळेश्वर पाली, चिंतामणी थेउर, मयुरेश्वर मंदिर मोरगाव, सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक, महागणपती रांजणगाव, विघ्नेश्वर मंदिर ओझर आणि शेवटी गिरिजात्मज मंदिर (लेण्याद्री) येथे त्याच दिवशी रात्री १०.१७ मिनिटांनी हा प्रवास समाप्त केला. अष्टविनायक दर्शनासाठी रश्मी यांना १७ तास ७ मिनिटे ( १२ तास २९ मिनिटे १९ सेकंद या फिरत्या वेळेसह) इतका वेळ लागला. यासाठी एकूण ४६३.५१ किलोमीटर अंतर पार करावे लागले. एका दिवसात अष्टविनायक दर्शन दुचाकीवरून करण्याबाबत इंडिया बुक रेकॉर्डला त्यांनी कळविले होते. या प्रवासाची शहानिशा करून त्याची नोंद इंडिया बुक रेकॉर्डमध्ये करून त्याचे प्रमाणपत्र आणि मेडल रश्मी परब यांना देऊन गौरविण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in