
मुंबई : शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून आपल्याच प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना अंधेरीतील वर्सोवा परिसरात घडली आहे. १८ वर्षांच्या कॉलेज तरुणीवर प्राणघातक हल्ला करून पळून गेलेल्या दीपक जितेंद्र मालाकर या २६ वर्षांच्या आरोपी प्रियकराला वर्सोवा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून दीपकने प्रेयसीला बेदम लाथ्याबुक्यांनी मारहाण करून तिचे डोके जमिनीवर आपटले. नंतर उशीने तिचे तोंड आणि नाक दाबून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ही घटना गुरुवार १० ऑगस्टला रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास अंधेरीतील वर्सोवा गाव, गोमा गल्लीतील नाखवा हाऊसच्या तिसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक ३०२ मध्ये घडली. तक्रारदार तरुणी आणि दीपक यांच्यात प्रेमसंबंध होते. सोशल मीडियावरून त्यांची ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले होते. ते दोघेही लग्न करणार होते. गेल्या गुरुवारी तो तिला भेटण्यासाठी आला होता. मित्राच्या घरातून काही सामान आणायचे आहे, असे सांगून तिला सोबत नेले. काही वेळानंतर ते दोघेही नाखवा हाऊसच्या एका रूममध्ये आले होते. तिथे त्याने तिच्याशी लगट करून शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्यास प्रेयसीने नकार दिला. त्यावरून त्यांच्यात प्रचंड वाद झाला. याच वादानंतर त्याने तिला बेदम मारहाण केली. त्याच्या हल्ल्यात ती बेशुद्ध पडली, मात्र ती मृत झाल्याचे समजून तो तेथून पळून गेला होता.
स्थानिक रहिवाशांकडून याची माहिती मिळताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी तरुणीला तातडीने पोलिसांनी कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी दीपक मालाकर याच्याविरुद्ध ३०७, ३५४, ३५४ डी, ३४२, ५०४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदवत त्याला सूरत येथून अटक केली. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली.