मातीच्या घटापासून आकर्षित मटकी ;मटक्यातील शोभिवंत झाडे पर्यटकांचे आकर्षण

मातीचे घट वाया न घालवता त्याचा चांगला उपयोग करता यावा यासाठी प्रयत्न केले
मातीच्या घटापासून आकर्षित मटकी ;मटक्यातील शोभिवंत झाडे पर्यटकांचे आकर्षण

मुंबई : नवरात्रोत्सवात घटस्थापनेनंतर विसर्जित करण्यात आलेल्या मातीच्या घटाची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पालिकेच्या एम पश्चिम विभाग कार्यालय क्षेत्रात नवरात्रोत्सवात मातीची २५० हून अधिक घट विसर्जित करण्यात आली होती. ती मटकी संभाळून त्यात शोभिवंत झाडे लावली आहेत. एम पश्चिम विभाग कार्यालयात ठिकठिकाणी ही आकर्षक मटकी ठेवण्यात आली आहेत. एम पश्चिम विभाग कार्यालयात येणाऱ्या व्हिजीटरसाठी शोभिवंत झाडे लावलेली मटकी आकर्षण ठरत असल्याचे पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

संपूर्ण मुंबईत गणेशोत्सवात गणेश मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर माती गोळा करण्यात येते. यंदाच्या गणेशोत्सवात विसर्जनानंतर तब्बल ६०० टन माती जमा झाली होती. या मातीपासून खत निर्मिती करत पालिकेच्या उद्यानात वापर करण्यात येतो. त्याचप्रमाणे नवरात्रोत्सव घट स्थापना करण्यात येते. नवरात्रोत्सव विसर्जनादिनी मातीच्या घटाचे विसर्जन करण्यात येते. परंतु एम पश्चिम विभाग कार्यालयामार्फत सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना व घराघरात घट स्थापना करणाऱ्यांना आवाहन केले होते की, मातीचे घट विसर्जित न करता आम्हाला देण्यात यावे. सुमारे २५० हून अधिक मातीचे घट जमा झाले. जमा करण्यात आलेल्या मातीच्या घटात विविध प्रजातींची झाडे लोकांचे लक्ष वेधून घेत असल्याचे परदेशी यांनी सांगितले.

टाकाऊ पासून टिकाऊ वस्तुंची निर्मिती करण्यात येते. मातीचे घट वाया न घालवता त्याचा चांगला उपयोग करता यावा यासाठी प्रयत्न केले. मातीच्या घटात आकर्षक शोभिवंत झाडे लावली, या संकल्पनेला एम पश्चिम कार्यालयात सहाय्यक उद्यान अधीक्षक सुदर्शन आवारे शितल मस्के उ. वि. स., अमोल इंगळे आदींचे सहकार्य लाभले.

उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, एम पश्चिम विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रीच्या घटस्थापनेनंतर विसर्जित करण्यात आलेल्या सुंदर अशा मातीच्या घटांपासून साजेशी झाडे लावून दिवाळी निमित्त एम/प विभाग कार्यालय येथे उद्यान विभागामार्फत सजावट करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया

एवढी सुंदर मातीची घट वाया न जाऊ देता त्यापासून साजेशी झाडे लावून एम पश्चिम विभाग कार्यालयाची दिवाळी निमित्त सजावट केली आहे. झाडांच्या सुशोभीकरणात त्या टाकावू मडक्यांनी भर घातली आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयात प्रदर्शन आयोजित करण्यात येते. त्यावेळी मातीच्या घटात आकर्षक झाडे लावत प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत.

पुजा राठोड, कनिष्ठ वृक्ष अधिकारी, एम पश्चिम विभाग कार्यालय

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in