मुंबई : एचआयव्हीबाबत तरुणांमध्ये खेळाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेतर्फे महाविद्यालयीन युवा वर्गासाठी ‘रेड रन मॅरेथॉन’ स्पर्धा घेण्यात आली. युवकांमध्ये सिद्वार्थ महाविद्यालयाचा अजित यादव तर युवतींमध्ये झुनझुनवाला महाविद्यालयाची सोनी जैसवाल यांनी पहिला क्रमांक पटकाविला. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेतर्फे गोवा येथे होणाऱ्या ‘रेड रन मॅरेथॉन’ स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था ही बृहन्मुंबई महानगरपालिका संचलित संस्था आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार मुंबईमध्ये एचआयव्ही, एड्स नियंत्रणासाठी ही संस्था कार्यरत आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुधाकर शिंदे यांच्या सुचनेनुसार या वर्षीही एचआयव्ही तथा एड्सबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेतर्फे मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘रन फॉर एण्ड एड्स’ याअंतर्गत वडाळा येथे शनिवारी ‘एमडॅक्स रेड रन मॅरेथॉन स्पर्धा’ घेण्यात आली. या स्पर्धेत ५५० महाविद्यालयीन युवक आणि युवतींनी सहभाग घेतला. राष्ट्रीय सेवा योजनेचे १५० स्वयंसेवक मॅरेथॉन मार्गावर कार्यरत होते.
क्यूआर कोड स्कॅन करताच डेटा उपलब्ध
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त तथा मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक रमाकांत बिरादार यांच्या हस्ते यावेळी एमडॅक्स एचआयव्ही केअर या क्यूआर कोडचे अनावरण करण्यात आले. हा कोड स्कॅन केल्यावर एचआयव्ही, एड्सबाबतची संपूर्ण माहिती, वैद्यकीय तपासणी, उपचार आदींबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच, या आजाराबाबतचे गैरसमजही दूर केले जाणार आहेत.
युवकांनी दूत बनून जनजागृती करावी -बिरादार
बिरादार यावेळी म्हणाले की, “युवकांनी युवा दूत बनून आपल्या महाविद्यालयांमध्ये, समाजामध्ये एचआयव्ही-एड्सबाबत जनजागृती करावी. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेमार्फत युवकांमध्ये एचआयव्ही-एड्सबाबत जनजागृती करण्याकरिता पथनाट्य स्पर्धा, रिल मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांकरीता एचआयव्ही या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा भरवण्याचे नियोजन आहे.