सायन तलावात मोठ्या गणेशमूर्ती विसर्जनास बंदी ; फक्त चार फुटांपर्यंत मूर्तींचेच विसर्जन

सायन तलाव पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून मासे, कासवांचे वास्तव्य
सायन तलावात मोठ्या गणेशमूर्ती विसर्जनास बंदी ; फक्त चार फुटांपर्यंत मूर्तींचेच विसर्जन
Published on

मुंबई : सायन तलाव जास्त खोल नसल्याने त्या ठिकाणी मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यास मूर्तींचे वेळीच विघटन होणार नाही. त्यामुळे चार फुटांपर्यंत गणेशमूर्ती विसर्जन करण्यास परवानगी आहे. चार फुटांवरील गणेशमूर्तींचे दादर, माहिम, गिरगाव चौपाटी येथे विसर्जन करावे, असे आवाहन गणेश मंडळांना केल्याचे एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांनी सांगितले.

सायन तलाव पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून मासे, कासवांचे वास्तव्य आहे. तसेच तलावाची खोली कमी आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून चार फुटांपर्यंत मूर्तींचे विसर्जन करण्यास परवानगी दिली आहे. तलाव परिसरात फलक लावण्यात आले असून गणेश मंडळांना आगाऊ सूचना दिल्या असल्याने विसर्जनदिनी मंडळांचा वेळ वाया जाणार नाही.

सायन परिसरातील एन. एस. मंकीकर मार्गालगत सायन तलाव आहे. या तलावात दरवर्षी शीव, चुनाभट्टी व नजिकच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने गणेश मूर्ती विसर्जनासाठी येत असतात. या तलावाची भौगोलिक वैशिष्ट्ये, परिस्थिती व तलावातील जलचर आदी बाबी लक्षात घेऊन, या तलावात चार फुटांपर्यंतच्या मूर्ती विसर्जनासाठी आणाव्यात. यापेक्षा अधिक मोठ्या मूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्यासाठी दादर, माहीम व गिरगाव चौपाटीवर घेऊन जाव्यात, असे आवाहन चक्रपाणी अल्ले यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in