ब्रिटिशकालीन वांद्रे स्थानकाच्या सौंदर्यीकरणाला सुरुवात

ब्रिटिशकालीन वांद्रे स्थानकाच्या सौंदर्यीकरणाला सुरुवात

सद्य:स्थितीत वांद्रे स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात असून त्यासाठी १० कोटी रुपयांचा खर्च येणार

ब्रिटिशकालीन वांद्रे स्थानकाचे संवर्धनाचे काम अनेक महिन्यांपासून प्रलंबित होते. अखेर या कामाला सुरुवात झाली असून, विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. येत्या पाच महिन्यांत वांद्रे स्थानकाच्या सौंदर्यात भर पडणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. सद्य:स्थितीत वांद्रे स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात असून त्यासाठी १० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

१८ नोव्हेंबर, १८६४ रोजी वांद्रे रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात आले. या स्थानकाच्या इमारतीची निर्मिती १८८८ साली झाली. चर्चगेट ते डहाणू दरम्यानच्या लोकल गाड्यांना तसेच हार्बरवरील सीएसएमटी ते गोरेगाव लोकल गाड्य़ांना या स्थानकात थांबा देण्यात आला आहे. सर्वाधिक गर्दीचे आणि मोक्याचे असणाऱ्या ऐतिहासिक स्थानकाचे संवर्धन आणि जपणूक करण्याचा निर्णय मागील काही महिन्यांपूर्वी पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला.

अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूददेखील करण्यात आली आहे. वास्तुविशारद व काही तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्याच्या कामाला दोन ते तीन वर्षांपूर्वी सुरुवात झाली. मधल्या काळात कोरोनामुळे हे काम रखडले होते; मात्र आता ते पुन्हा जोमाने सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, स्थानकात प्रवाशांना मोकळा वावर मिळावा, यासाठी स्थानकातील सर्व खाद्यपदार्थ व अन्य स्टॉल्स देखील दुसरीकडे स्थलांतरित केले जात असून आरेखनातही बदल करण्यात आले आहेत. याशिवाय इमारतीची डागडुजीही केली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in