
मुंबई : बेस्ट कामगारांना कुटुंबासह गटविमा लागू करावा, कायमस्वरुपी सेवेत सामावून घेणे अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुन्हा एकदा कंत्राटी कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बेस्ट उपक्रमाच्या डेपो परिसरात शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी महामेळावा आयोजित करण्यात आला असून, या मेळाव्यात विविध मागण्यांवर चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचे बेस्ट वर्कर्स युनियनकडून सांगण्यात आले.
बेस्ट उपक्रमांतील कंत्राटी कामगारांचे प्रश्न मागील अनेक वर्षापासून सुटलेले नाहीत. कंत्राटी कामगारांना बेस्टच्या कायमस्वरुपी सेवेत घेण्याबाबत सातत्याने मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. अनेक वर्ष काम करूनही या कामगारांना कायम सेवेत सामावून न घेतल्याने त्यांना तुटपुंज्या पगारात काम करावे लागते आहे. त्यामुळे या सर्व कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी सेवेत घेण्याबाबतची प्रमुख मागणी आहे.
'या' आहेत मागण्या
-बस गाड्यांचा ताफा वाढवण्यात यावा.
-पालिकेने 'बेस्ट'ला तातडीने आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा.
-बेस्ट उपक्रमाशी संबंधित 'क' अर्थसंकल्प महापालिकेच्या 'अ' अर्थसंकल्पात विलिन करण्याचा निर्णय घ्यावा.
-हजारो रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत.