बेस्टच्या जुन्या बसेसमध्ये आता रेस्टॉरंट, आर्ट गॅलरी, वाचनालय

बेस्टच्या जुन्या बसेसमध्ये आता रेस्टॉरंट, आर्ट गॅलरी, वाचनालय

इतिहासजमा झालेल्या एका डबलडेकर बसचे जतन करण्यात येणार आहे
Published on

मुंबई : खवय्यांना विविध पदार्थांचा आस्वाद घेता यावा, यासाठी रेस्टॉरंट, रसिकांसाठी आर्ट गॅलरी, वाचनालय अशा विविध प्रकारच्या सुविधा मुंबईकरांना आता बेस्ट बसेसमध्येही मिळणार आहेत. वर्षानुवर्षे मुंबईकर प्रवाशांना सेवा देणाऱ्या बेस्ट बसेसचे आयुर्मान संपुष्टात आल्यानंतर बेस्टच्या स्वमालकीच्या बसेस भंगारात न काढता त्या मॉडिफाय करत त्याचा उपयोग रेस्टॉरंट, आर्ट गॅलरी व वाचनालयासाठी करण्यात येणार आहे.

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील १,६९४ तर स्वमालकीच्या १,२८४ अशा एकूण २,९७८ बसेसचा ताफा आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात असलेल्या स्वमालकीच्या १,२८४ बसेसचे आयुर्मान संपुष्टात येत असून या बसेस भंगारात न काढता त्याचा उपयोग रेस्टॉरंट, आर्ट गॅलरी, वाचनालय यासाठी करण्याबाबत विचार असल्याचे मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. बेस्टच्या ताफ्यात असलेल्या दुमजली बसेसपैकी एक डबलडेकर बसचे जतन करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. त्यामुळे इतिहासजमा झालेल्या एका डबलडेकर बसचे जतन करण्यात येणार आहे. बेस्टच्या बसेस भंगारात न काढता त्याचा उपयोग मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी होईल का, याचा विचार सुरू असून त्या बसेस भंगारात न काढता रेस्टॉरंट, आर्ट गॅलरी, वाचनालय सुरू केल्यास त्या बसेसचा उपयोग होईल, असेही ते म्हणाले.

महानगरपालिकेच्या शाळांमध्ये किचन गार्डन सुरू करणे, मध्यान्ह भोजनात भाजीपाल्याचा योग्यप्रकारे वापर करणे, शाळांच्या इमारतींचे सुशोभीकरण करणे; शाळेतील ग्रंथालयांमध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर आदी प्रेरणादायी व्यक्तींची आत्मचरित्रे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणे; प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एका ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्राची निर्मिती या विविध कामांचा आढावा केसरकर यांनी घेतला.

बेस्ट बसेसचा ताफा

स्वमालकीच्या - १,२८४

भाडेतत्त्वावरील - १,६९४

एकूण - २९७८

logo
marathi.freepressjournal.in