भाईंदरमध्ये महापालिकेत पत्रकारांना धक्काबुक्की; भाजप नगरसेवकांवर मारहाणीचे आरोप, पत्रकारांचे आंदोलन

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या महासभेदरम्यान चित्रीकरणाच्या मुद्द्यावरून गोंधळ निर्माण झाला.
भाईंदरमध्ये महापालिकेत पत्रकारांना धक्काबुक्की; भाजप नगरसेवकांवर मारहाणीचे आरोप, पत्रकारांचे आंदोलन
भाईंदरमध्ये महापालिकेत पत्रकारांना धक्काबुक्की; भाजप नगरसेवकांवर मारहाणीचे आरोप, पत्रकारांचे आंदोलन
Published on: 

भाईंंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या महासभेदरम्यान चित्रीकरणाच्या मुद्द्यावरून गोंधळ निर्माण झाला. यावेळी काही नागरिक आणि पत्रकारांना धक्काबुक्की, मारहाण व शिवीगाळ करण्यात आल्याचे आरोप झाले आहेत. पत्रकारांचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा आणि त्यांच्या दिशेने चप्पल फेकल्याचाही दावा करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त पत्रकारांनी महापालिका सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली.

महापालिकेची महासभा सुरू असताना प्रेक्षक गॅलरीत काही नागरिक मोबाईल घेऊन बसले होते. सभागृहाचे चित्रीकरण सुरू असल्याच्या संशयावरून वाद निर्माण झाला. महापौर डिंपल मेहता यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर सुरक्षारक्षक आणि पोलीस नागरिक कक्षात पोहोचले. त्यानंतर भाजपचे काही नगरसेवकही प्रेक्षक गॅलरीत गेले. तेथे मोबाईलद्वारे चित्रीकरण केल्याचा संशय असलेल्या नागरिकांशी वाद होऊन धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाण झाल्याचे आरोप करण्यात आले. सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तरीही परिस्थिती तणावपूर्ण राहिल्याचे सांगण्यात आले.

दोषींवर कारवाई करण्याची मागणी

घटनेनंतर पत्रकारांनी महापालिका सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. संबंधितांवर पत्रकार संरक्षण कायद्यासह लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी आणि संबंधित नगरसेवकांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. या घटनेचा काँग्रेस, शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निषेध व्यक्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पत्रकार आणि नागरिकांवरील कथित हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)