भिवंडी : माणुसकीला काळीमा फासणारी घटना भिवंडीत उघड झाली आहे. शहरात सहा वर्षीय चिमुरडीची हत्या करून तिचा मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून आरोपी फरार झाल्याची घटना उघड झाली आहे. परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. ही घटना शहरातील फेणेगाव परिसरातील धापसी पाडा येथील एका चाळीत घडली. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलीचे आई-वडील भिवंडीतील एका गोदामामध्ये काम करतात. १३ सप्टेंबर रोजी आई-वडील तिला घरी ठेवून निघून गेले होते. या मुलीसोबत तिचा नऊ वर्षांचा भाऊ घरी होता. त्यावेळी चिमुरडी सकाळपासूनच बेपत्ता असताना सायंकाळी आई-वडील घरी आल्यानंतर मुलाने बहीण दिसत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर आई-वडिलांनी परिसरात शोध घेत रात्री उशिरा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची नोंद केली. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध घेण्यास सुरुवात केली, त्यानुसार १४ सप्टेंबर रोजी नजीकच्या वऱ्हाळा तलावामध्ये पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली.
शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी दुपारी परिसरात दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिल्यानंतर भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात शोध घेतला असता एका बंद असलेल्या चाळीतील खोलीतील बादलीत मुलीचा मृतदेह कोंबून ठेवल्याचे आढळले. पोलिसांनी तात्काळ घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात पाठवला. ठाणे येथील ठसे तज्ज्ञ पथक घटनास्थळी दाखल झाले. भिवंडी शहर पोलीस ठाण्यात कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके ठिकठिकाणी रवाना केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.