ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप - शिंदे गटाने मारली बाजी

शिवसेना ठाकरे गट मात्र चौथ्या क्रमांकावर असून, केवळ १२ जागा ठाकरे गटाला मिळाल्या आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप - शिंदे गटाने मारली बाजी

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीला स्पष्ट कौल दिला असून, ५८१ पैकी २९९ ग्रामपंचायतींमध्ये युतीचे सरपंच निवडून आले आहेत, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जनतेने या निकालाद्वारे विश्वास व्यक्त केला असून, आपण दोन्ही नेत्यांचे अभिनंदन करतो,” असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस ६२ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर असून काँग्रेसला ३७ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना ठाकरे गट मात्र चौथ्या क्रमांकावर असून, केवळ १२ जागा ठाकरे गटाला मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीने मात्र भाजपचा दावा खोडून काढला असून ग्रामपंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाहीत, असे स्पष्ट केले आहे.

“राज्यात मतदान झालेल्या ग्रामपंचायतींपैकी ५८१च्या निकालाची माहिती उपलब्ध झाली असून, भारतीय जनता पक्षाचे सरपंच २५९ ठिकाणी निवडून आले आहेत व या निवडणुकीतही भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सरपंच ४० ठिकाणी निवडून आले आहेत. दोन्हीचा एकत्रित विचार करता ५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये युतीचे सरपंच लोकांनी निवडून दिले आहेत. या कौलाबद्दल आपण मतदारांचे आभार मानतो आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. जनतेतून थेट निवडून दिलेला सरपंच हा संपूर्ण गावाला उत्तरदायी असतो. त्या दृष्टीने शिंदे फडणवीस सरकारने सरपंचाची थेट निवड करण्याचा निर्णय घेतला होता, त्यावरही जनतेने या निकालाद्वारे शिक्कामोर्तब केले आहे,” असेही बावनकुळे म्हणाले.

भाजपने स्वत:च्या व शिंदे गटाने जिंकलेल्या ग्रामपंचायतीचा दावा केलाच; पण महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी जिंकलेल्या जागाही सांगितल्या. राष्ट्रवादीने ६२, काँग्रेस ३७, उद्धव ठाकरे गट १२, स्थानिक आघाड्या १६ आणि अपक्षांनी १९ ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ग्रामपंचायती निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर लढवता येत नाहीत; पण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले आहेत, असा दावा केला. ६०८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. पैकी ५१ ठिकाणी बिनविरोधी निवडी झाल्या. आज ५४७ ग्रामपंचायतीची मतमोजणी सुरळीत पार पडली. त्याचे निकाल जाहीर झाले आहेत.

कामाची पोचपावती

ग्रामपंचायत निवडणुकांत सगळ्यात पुढे एक नंबरला आमची युती आहे. आम्ही जे सरकार स्थापन केले, ते सर्वसामान्य जनतेच्या मनातले सरकार आहे. त्यामुळेच लोकांचा कौल मिळाला. आम्ही चांगले काम करू. लोकांना जे हवे आहे ते देण्याचा प्रयत्न करू. त्यांनी गेल्या अडीच वर्षांत जे काम केले व आम्ही गेल्या दोन महिन्यांत जे काम केले, त्याची पोचपावतीच जनतेने दिली.

- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

पुढच्या निवडणुकाही एकत्रच लढविणार

मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन हिंदुत्वाच्या विचारावर चालणारी शिवसेना आहे. आजच्या निकालांत भाजप आणि शिवसेनेच्या युतीला जनतेने पूर्णपणे स्वीकारले आहे. ही भविष्याची नांदी आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकांतही हेच चित्र दिसणार आहे. पुढच्या निवडणुकादेखील आम्ही एकत्र लढू. त्यात निश्चितच आमचा विजय होताना दिसेल.

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in