नवरात्रोत्‍सवात भाजपचे शिवसेनेसमोर मोठे आव्हान; अवधूत गुप्ते, फाल्गुनी पाठक यांच्या कार्यक्रमांचे केले आयोजन

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेनेला हे तगडे आव्हान दिले आहे
 नवरात्रोत्‍सवात भाजपचे शिवसेनेसमोर मोठे आव्हान; अवधूत गुप्ते, फाल्गुनी पाठक यांच्या कार्यक्रमांचे केले आयोजन

यंदाच्या नवरात्रोत्‍सवात भाजपने शिवसेनेसमोर मुंबईत दांडिया, गरबा आणि भोंडल्‍याचे मोठे आव्हान उभे केले आहे. भाजपने विविध मंडळांना पुरस्कृत केले आहे. २४२ मंडळे ३०० ठिकाणी ‘उदे गं अंबे उदे’चा नारा भाजप देणार आहे. तसेच भाजपतर्फे मुंबईत भव्य स्वरूपात १७ ठिकाणी दांडिया, भोंडलाचे आयोजन करण्यात आले आहे. दांडिया क्‍वीन फाल्‍गुनी पाठक, प्रीती-पिंकी, मराठी स्‍टार गायक अवधूत गुप्ते अशी तगडी स्टारकास्‍ट भाजप उतरवणार आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेनेला हे तगडे आव्हान दिले आहे.नवरात्रोत्‍सवात गुजराती समाजाकडून गरबा, दांडिया मोठ्या प्रमाणात खेळला जातो; मात्र दांडिया-गरबा विशेषतः दांडिया हा प्रकार मराठी तसेच इतर भाषक लोकांमध्येही लोकप्रिय आहे. अनेक ठिकाणी तर पूर्णपणे मराठी असलेल्‍या भागांमध्येही दांडिया अनेक वर्षांपासून जोमाने खेळला जातो. कोरोनामुळे गेली दोन वर्षे इतर सर्व गोष्‍टींप्रमाणेच दांडियाचेही आयोजन झाले नव्हते. यंदाच्या वर्षी त्‍याची पूर्ण कसर भरून काढण्यात येणार आहे. भाजपने तर आधीच आपले सरकार आले आणि हिंदू सणांवरील विघ्‍न टळले, अशी टॅगलाइन घेऊन शिवसेनेला कॉर्नर करण्याचा प्रयत्‍न केला आहे. आता दांडियाच्या माध्यमातून भाजपचा पारंपरिक गुजराती मतदाराला तर खूश करण्याचा प्रयत्‍न तर आहेच; पण मराठी तसेच इतर भाषकांनादेखील आकर्षित करण्यात येणार आहे.

‘उदे गं अंबे उदे’चा मध्यरात्रीपर्यंत गजर

काळाचौकी येथील अभ्‍युदय नगर या मराठीबहुल भागापासून ते सायन,जुहू, मुलूंड, बोरिवली अशा सर्वच ठिकाणी भाजपने ‘उदे गं अंबे उदे’चा नारा देत दांडियाचा गजर केला आहे. किमान तीन दिवस तरी रात्री १० वाजेपर्यंत असणारी वेळेची मर्यादा रात्री १२ वाजेपर्यंत वाढविण्याची मागणी भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्‍यामुळे दांडियाच्या माध्यमातून शिवसेनेवर या नवरात्रोत्‍सवात कुरघोडी करण्याचा भाजपचा प्रयत्‍न असेल. आता शिवसेना याला कसे प्रत्‍युत्तर देणार, हे पाहावे लागणार आहे.

शिवसेनेचे ‘बये दार उघड’

भाजपने मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दांडिया रासचे आयोजन करत शिवसेनेला शह दिला आहे. आता शिवसेनेनेदेखील ‘बये दार उघड’चा जागर करत प्रत्‍युत्‍तर दिले आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून राज्यभर ही मोहीम राबविली जाणार आहे. विजयादशमीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा ही शिवतीर्थावर होणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील जी साडेतीन पीठ आहेत, त्यात कोल्हापूरची श्री महालक्ष्मी, तुळजापूरची श्री भवानी माता, नाशिक जिल्ह्यातील वणीची सप्तशृंगी माता आणि चांदवड, नांदेडच्या माहूरची रेणुका माता या सर्व ठिकाणी देवीची आरती केली जाणार आहे. त्या त्या ठिकाणी देवीला साकडे घालण्यात येणार आहे. या प्रत्येक ठिकाणाहून प्रसाद शिवतीर्थावर सभेच्या ठिकाणी आणला जाणार आहे.शिवसेना महिला आघाडी, युवाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने ‘बये दार उघड’ अशा प्रकारची मोहीम हाती घेतलेली आहे. न्यायाची, सुरक्षेची, प्रगतीची कवाडे खुली होऊन महिला आणि समाजाच्या हितासाठी सर्व काही मंगल व्हावे, अशी देवीच्या चरणी प्रार्थना आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in