लोकसभेत महाराष्ट्र काबीज करण्यासाठी भाजपचे मिशिन सुरु; बारामतीसह १६ लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष

पुढील १८ महिन्यांच्या कालावधीत तब्बल सहा वेळा केंद्रीय मंत्री त्यांच्यावर जबाबदारी दिलेल्या मतदारसंघांचा दौरा करणार आहेत.
लोकसभेत महाराष्ट्र काबीज करण्यासाठी भाजपचे मिशिन सुरु; बारामतीसह १६ लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष

२०२४च्या लोकसभा निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असला, तरी भाजपने आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी सरकार पोखरल्यानंतर आता लोकसभेतही महाराष्ट्र काबीज करण्यासाठी भाजप धुरिणांनी कंबर कसली आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत अपयश आलेल्या १६ मतदारसंघांवर भाजपने विशेष लक्ष दिले असून, नऊ केंद्रीय मंत्री या मतदारसंघांत ठाण मांडणार आहेत. पुढील १८ महिन्यांच्या कालावधीत तब्बल सहा वेळा केंद्रीय मंत्री त्यांच्यावर जबाबदारी दिलेल्या मतदारसंघांचा दौरा करणार आहेत.

प्रत्येकी तीन दिवसांच्या या दौऱ्यात २१ कार्यक्रमांची रचना करण्यात आली असून, या काळात पक्षीय बदल, स्थानिक पातळीवरील अडचणी, संघटनात्मक कार्यक्रम, धार्मिक स्थळांना भेटी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असे कार्यक्रम नियोजित करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या आहेत की नाही, याची पाहणी केली जाणार असून, या प्रवासात कार्यकर्त्यांशी संवाद आणि पक्ष संघटनेवर विशेष भर दिला जाणार आहे.

भाजप सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या या विशेष मिशनची माहिती दिली. कल्याण आणि मध्य मुंबईत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, दक्षिण मुंबईमध्ये नारायण राणे, पालघरमध्ये विश्वेश्वर तुडू, रायगड आणि शिर्डी मतदारसंघात प्रल्हाद पटेल, बारामतीमध्ये निर्मला सीतारामन, औरंगाबाद आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघात भूपेंद्र यादव, चंद्रपूरला हरदीपसिंग पुरी या केंद्रातील प्रभावी मंत्र्यांवर संबंधित लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी असणार आहे.

भाजपच्या कार्यक्रमांमध्ये धार्मिकस्थळांना भेटी, आध्यात्मिक गुरूंच्या गाठीभेटी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटी, सहकार क्षेत्रातील अग्रणी नेते, व्यापारी, वकील, डॉक्टर यांच्या वेगवेगळ्या बैठका, पत्रकार संवाद, सर्व स्तरावरील संघटनात्मक, शासकीय अधिकारी यांच्या बैठका तसेच स्वस्त धान्याच्या दुकानातदेखील केंद्रीय मंत्री भेट देणार आहेत. केंद्र सरकारकडून राबवलेल्या योजना सर्वसामान्यांपर्यंत नीटपणे पोहोचत आहेत का? याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री जागोजागी जातील.

पवारांच्या बालेकिल्ल्यात निर्मला सीतारामन

बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या दोन वेळेला त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या मतदारसंघातून निवडून आल्या. आता भाजपने ‘मिशन २०२४’ हाती घेत बारामती मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या देशातील १४१ जागांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. या जागा जिंकण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांकडे देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in