भाजपच्या सत्तेचा मार्ग झाला मोकळा

भाजपसोबतची युती तोडत अडीच वर्षांपुर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले
भाजपच्या सत्तेचा मार्ग झाला मोकळा

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपुर्द केला. महाआघाडी सरकार अल्पमतात आल्याने भाजपचा आता सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्‍यपाल सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्‍तास्‍थापनेचे आमंत्रण देतील. येत्‍या शनिवारी (दि.१ जुलै) भाजपच्या नेतृत्‍वाखालील नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ‘मी पुन्हा येईन’चा नारा दिला होता; मात्र शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरून भाजपसोबतची युती तोडत अडीच वर्षांपुर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. ठाकरे यांचा महाआघाडीतील मुख्यमंत्रीपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर लगेचच शिवसेनेत फूट पडली आणि बुधवारी ठाकरे सरकार कोसळले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईन’ चा नारा आता सत्यात उतरणार आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी सकाळी महाआघाडी सरकारला उद्याच (३० जून) बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. त्याला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले; मात्र सर्वोच्च न्यायालयानेही शिवसेनेची याचिका फेटाळल्याने भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in