क्रिकेट तिकिटांचा काळाबाजार भारत-न्यूझीलंड सामन्याचे तिकीट १ लाख रुपयांना

कोठारी आणि गुरुबक्षानी यांच्या कटकेमुळे पोलिसांचे लक्ष एका आघाडीच्या ऑनलाइन तिकीट बुकिंग बेवसाईटकडे गेले.
क्रिकेट तिकिटांचा काळाबाजार भारत-न्यूझीलंड सामन्याचे तिकीट १ लाख रुपयांना

मुंबई : भारतात सध्या सुरू असलेली क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आता अंतीम टप्प्यात पोहोचली आहे. त्यामुळे या स्पर्धेतील उर्वरीत उपांत्य आणि अंतीम फेरीचे सामने पाहण्यासाठी जगभरातून प्रेक्षक येत आहेत. त्यामुळे सामन्यांच्या तिकीटांचा काळाबाजारही तेजीत आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्याचे बुधवारी मुंबईत २५०० रुपयांचे तिकीट ५० हजार ते १ लाख रुपयांना विकले गेले. वानखेडे स्टेडियमवर तिकीटाच्या आशेने येणाऱ्या प्रेक्षकांना ओळखून काळाबाजार करणारे तिकीटांची विक्री करत होते. या प्रकरणी रोशन गुरुबक्षानी व आकाश कोठारी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

यंदाचा विश्वचषक भारतात होत असतानाच भारतीय क्रिकेट संघ उपांत्य फेरीत पोहोचला. त्यामुळे विश्वचषक जिंकण्याच्या दृष्टीने भारत-न्यूझीलंड सामना अत्यंत महत्वाचा होता. या सामन्यात काय होणार, याची उत्कंठा भारतीय प्रेक्षकांना होती. त्यातच हा सामना भारतीय क्रिकेटची पंढरी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयोजित केला होता. भाऊबीजेचा दिवस असल्याने सुट्टी होती. त्यामुळे हजारो प्रेक्षक या सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. वानखेडे स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ३१ हजार आहे. त्यामुळे हा सामना पहायला प्रेक्षकांची प्रचंड उत्सुकता असणार, हे ठरलेलेच होते. त्याचाच फायदा काळाबाजारवाल्यांनी उठवला. यातून त्यांनी लाखो रुपयांचा मलिदा गोळा केला.

वानखेडे स्टेडियमवर भारतीय क्रिकेट संघाला ‘चिअरअप’ करण्यासाठी प्रेक्षकांना यायचे होते. त्याचाच फायदा काळ्याबाजारवाल्यांनी उठवला. सामना सुरू होण्यापूर्वी काही प्रेक्षक वानखेडे स्टेडियमवर शेवटच्या क्षणी तिकीट मिळते का, यासाठी प्रयत्न करत होते. प्रेक्षकांची ही आतुरता काळ्याबाजारवाल्यांनी हेरली. ते स्वत: पुढे येऊन ‘तुम्हाला तिकीट हवे का?’ अशी विचारणा करत होते. तसेच त्या प्रेक्षकाला बाजूला घेऊन तिकीटाची किंमत सांगितली जात होती. यावेळी चौकशी केली असता, ३ हजारांचे तिकीट १५ हजारांना विकले जात असल्याचे आढळून आले.

कोठारी आणि गुरुबक्षानी यांच्या कटकेमुळे पोलिसांचे लक्ष एका आघाडीच्या ऑनलाइन तिकीट बुकिंग बेवसाईटकडे गेले. ही बेवसाईट भारतातील सर्व बीसीसीआयच्या क्रिकेट सामन्यांसाठी एकमेव अधिकृत तिकीट भागीदार आहे. टीम इनोव्हेशनचे सह-संस्थापक सिद्धेश कुडतरकर आणि दुसरी आघाडीची ऑफलाइन तिकीट एजन्सी विंक एंटरटेनमेंट हे क्रिकेट सामन्यांच्या तिकिटांच्या मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारासाठी पोलिसांच्या रडारवर आले आहेत. भारत-न्यूझीलंड उपांत्य सामन्याची ७० टक्के तिकीटे आरक्षित करण्यात आली. त्यानंतर ही तिकीटे १ लाख रुपयांपर्यंत काळ्या बाजारात विकण्यात आली.

या आरोपींच्या मोबाईल आणि इतर डिजिटल उपकरणांच्या छाननीतून मुंबई, पुणे, हैदराबाद आणि गोव्यातील अनेक प्रमुख कार्यक्रमांसाठी तिकीटांचा काळाबाजार केल्याचे अनेक पुरावे मिळाले आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

जे. जे. मार्ग पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आकाश कोठारी हा ३० वर्षांचा असून तो मालाडला राहतो. तो घरातून ५० हजार ते १ लाख रुपयांना सोशल मीडिया ॲॅपवरून तिकीट विक्री करत होता. ही तिकीटे रोशन गुरुबक्षानी त्याला देत होता. एका तिकीटाची किंमत २५०० रुपये असताना हे आरोपी १४ पट अधिक दराने त्याची विक्री करत होते, असे उप पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी सांगितले.

ऑनलाइन तिकीट बुकिंग कंपनीमार्फत अशा सर्व कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात तिकिटे जमा केली जातात. जीएसटी आणि इतर कर टाळून अधिक नफ्यासाठी काळ्या बाजारात विक्रीसाठी एजंटांकडे जास्त मागणी असलेल्या क्रीडा स्पर्धांकडे वळवण्याचे मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय आहे.

बीसीसीआयचे मौन

हा तिकीटांचा काळाबाजार होत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) मौन बाळगून आहे. तिकीटांचा काळाबाजार करणारे आकाश कोठारी व रोशन गुरुबक्षानी हे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीसाठी काम करतात. ते भारतात संगीताचे, सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रम आयोजित करतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in