मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर आज ब्लॉक ;पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक नाही

हार्बर मार्गावरील सीएस एमटी चुनाभट्टी वांद्रे स्थानकादरम्यान ब्लाॅक असल्याने सीएसएमटी - कुर्ला विशेष लोकल चालवण्यात येत आहेत.
मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर आज ब्लॉक ;पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक नाही
Published on

मुंबई : रुळांची दुरुस्ती ओव्हरहेड वायर दुरुस्ती सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार १२ नोव्हेंबर रोजी मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत काही लोकल उशीराने धावत असून, काही लोकल रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी - विद्याविहार स्थानकादरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १०.५५ ते सायंकाळी ३.५५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत सीएसएमटी - विद्याविहार स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. दुरुस्ती कालावधीत भायखळा, परळ दादर, माटुंगा, सायन व कुर्ला स्थानकात थांबतील. विद्याविहार स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या असून, कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ व भायखळा स्थानकांत थांबतील.

हार्बर मार्गावर सीएसएमटी - चुनाभट्टी व वांद्रे स्थानकादरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल, बेलापूर, वाशी स्थानकातून सीएसएमटीला जाणाऱ्या व सीएसएमटी स्थानकातून वाशी, बेलापूर व पनवेलचे दिशेने जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सीएसएमटी वांद्रे, गोरेगाव स्थानकात जाणाऱ्या व गोरेगाव, वांद्रे स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सीएसएमटी - कुर्ला विशेष लोकल!

हार्बर मार्गावरील सीएस एमटी चुनाभट्टी वांद्रे स्थानकादरम्यान ब्लाॅक असल्याने सीएसएमटी - कुर्ला विशेष लोकल चालवण्यात येत आहेत. तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मेन लाईन व पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in