
मुंबई : पवईतील बोगस कॉल सेंटरचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला. याच प्रकरणात चार मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, या आरोपींनी विदेशी नागरिकांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या नागरिकांना कारवाईची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकाळल्याचे पोलिसांनी सांगितले. आदिल निसार अहमद सय्यद, अफाज मोसीन अली, मार्शल सेल्वराज आणि अविनाश गोपाळ मुदलीयार अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पवई परिसरात एक बोगस कॉल सेंटर सुरू असून, या कॉल सेंटरमधून विदेशी नागरिकांची फसवणूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी पवईतील साकीविहार रोड, हुंडाई शोरुम गल्लीतील सृष्टी प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावरील ०१२ मध्ये छापा टाकला होता. यावेळी तिथे बोगस कॉल सेंटर सुरु असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. या कारवाईत पोलिसांनी २५ लॅपटॉप, सहा मोबाईल फोन असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.