१४ स्मशानभूमींमध्ये दहनासाठी लाकडांऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’ वापर करण्यात येणार

१४ स्मशानभूमींमध्ये दहनासाठी लाकडांऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’ वापर करण्यात येणार

पर्यावरणाचे रक्षण व झाडांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता १४ स्मशानभूमींमध्ये दहनासाठी लाकडांऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’ वापर करण्यात येणार आहे. ब्रिकेट्सच्या वापरामुळे वर्षाला १८ लाख ६० हजार किलो लाकडांची बचत होणार आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

पर्यावरण रक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने सर्वस्तरीय प्रयत्न करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. या अनुषंगाने पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सातत्याने विविधस्तरीय कार्यवाही केली जात आहे. याच अंतर्गत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या आदेशांन्वये सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे मृतदेह दहनासाठी विविध पर्यायांची चाचपणी करण्यात आली.

या चाचपणी-अंती ‘शेती कचरा व वृक्ष कचरा’ यापासून तयार केलेल्या ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर हा तुलनेने अधिक पर्यावरणपूरक असल्याचे निदर्शनास आले. पारंपरिक स्मशानभूमीमध्ये प्रत्येक मृतदेहासाठी ३०० किलो लाकूड हे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मोफत पुरविण्यात येते. हे ३०० किलो लाकूड साधारणपणे दोन झाडांपासून मिळते; मात्र आता पर्यावरणपूरकतेचा भाग म्हणून १४ स्मशानभूमींमध्ये लाकडाऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्यात येणार असल्याचे डॉ. मंगला यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in