
मुंबई : स्वस्तात कार देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या गुन्ह्यांतील एका कार एजंटला गुन्हा दाखल होताच कांदिवली पोलिसांनी अटक केली. दयानंद शेखर सुवर्णा असे या ४७ वर्षांच्या एजंटचे नाव असून, अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दयानंदने आतापर्यंत एका वकिल महिलेसह तिघांची सुमारे ४४ लाखांची फसवणूक केली असून, फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्याच्याविरुद्ध कांदिवलीसह गोवंडी पोलीस ठाण्यात अशाच गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एका खासगी कंपनीत कामाला असलेले तक्रारदार कांदिवली परिसरात राहतात. त्यांनी नवीन कारसाठी दयानंदला तेरा लाख रुपये दिले होते; मात्र पेमेंट करुनही त्याने ४५ दिवसांत कारची डिलीव्हरी केली नव्हती. वारंवार विचारणा केल्यानंतर तो त्यांना टाळून विविध कारणे सांगत होता. चौकशीदरम्यान दयानंदने त्यांची मैत्रिणीसह व्यवसायाने वकिल असलेल्या दोघांची अशाच प्रकारे सुमारे ३१ लाखांची फसवणूक केली होती. कारसाठी पेमेंट घेऊन कार न देता त्यांनी दिलेल्या पैशांचा अपहार करून फसवणूक केली होती.