
मुंबई : फसवणुकीप्रकरणी सुरेश मेघराज श्रॉफ या बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध डी. एन नगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. सुरेश श्रॉफवर फ्लॅटसाठी तिघांकडून सुमारे पावणेतीन कोटी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सागितले. सुरेश श्रॉफ हा बांधकाम व्यावसायिक असून त्याच्या कंपनीने पार्टनरशीपमध्ये अंधेरीतील डी. एन नगर परिसरात विसावा-अध्याय सहकारी सोसायटी इमारतीच्या पुर्नविकासाचे काम हाती घेतले होते. याच सोसायटीमध्ये एअर इंडियामध्ये उपमहाप्रबंधक असलेले कॅप्टन परेश हेमंत नेरुरकर व इतर दोनणज शैलेश गुड्डू शेट्टी आणि उदय नारायण डोंगरे यांनी सहा फ्लॅट बुक केले होते. या फ्लॅटसाठी परेश नेरुरकर यांनी ८२ लाख, शैलेश शेट्टीने ८० लाख तर उदय डोंगरे यांनी १ कोटी १० लाख रुपये दिले होते; मात्र दिलेल्या मुदतीत सुरेश श्रॉफने त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. तसेच फ्लॅटबाबत झालेल्या कराराची प्रतही दिली नव्हती. वारंवार विचारणा करूनही त्याच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी डी. एन नगर पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर चार दिवसांपूर्वी सुरेश श्रॉफविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.