नवाब मलिक यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल; समीर वानखेडे यांची तक्रार

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात समीर वानखेडे यांनी कारवाई करत बॉलिवूडचा अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनला अटक केली होती
नवाब मलिक यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कलमांतर्गत  गुन्हा दाखल; समीर वानखेडे यांची तक्रार

माजी अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरुद्ध बदनामीसह अॅट्रॉसिटी कलमांतर्गत गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला असून, या गुन्ह्यांचा तपास गोरेगाव विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे सोपवण्यात आला आहे.

कॉर्डिएला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात समीर वानखेडे यांनी कारवाई करत बॉलिवूडचा अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनला अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. ही कारवाई बोगस असल्याचे सांगून आरोपींच्या सुटकेसाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचे सांगून त्यांनी समीर वानखेडे यांच्याविषयी सोशल मीडियावर जातीवाचक टिपणी केली होती. ते अनुसूचित जातीतील नसून मुस्लीम असल्याचा दावा केला होता. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी झाली होती. संबंधित प्रकरण नंतर जात पडताळणी समितीकडे गेले होते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर समीर वानखेडे यांना समितीने क्लीन चिट दिली आहे. या क्लीन चिटनंतर समीर वानखेडे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात नवाब मलिक यांच्याविरुद्ध एका लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात बदनामीसह जातीविषयक आक्षेपार्ह टिपणी केल्याचा आरोप केला होता. या अर्जाची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध भादंविसह अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे सोपविण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in