
मुंबई महानगर पालिकेच्या कॅन्टीनमधून गेल्या वर्षभरात शेकडो जेवणाची ताट, चमचे, वाट्या आणि ग्लास गायब झाल्याचे समोर आले आहे. मुंबई महानगर पालिकेच्या उपहारगृहातुन गायब झालेल्या या भांड्यांमुळे त्याच्यावर अखेर फलक लावून सूचना देण्याची वेळ आली आहे. सध्या हे फलक सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. पालिकेतील काही कर्मचारी, अधिकारी जेवण किंवा नाश्ता आपल्या कार्यालयामध्ये मागवतात आणि त्यानंतर ती भांडी पुन्हा उपहारगृहाला मिळतच नाहीत.
गायब होत असलेल्या या भांड्यांमुळे कंत्राटदाराचे चांगलेच नुकसान होत आहे. अशामध्ये त्यांनी यासंदर्भात फलकच लावले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'मुख्यालयातील कामगार बंधुनो, आपणास विनंती करतो की उपहार गृहातील प्लेट, चमचे, ग्लास आणि ताट इ. सामान कामगार व अधिकारी बाहेर घेऊन जातात. त्यामुळे उपाहारगृहात कामगारांची या बाबतीत गैरसोय होते. तरीही, उपहारगृहातील प्लेट, चमचे, ग्लास आणि ताट बाहेर घेऊन जाऊ नये ही विनंती.'
तसेच, यामध्ये त्यांनी आत्तापर्यंत गायब झालेल्या भांड्याची यादीदेखील सांगितली आहे. ६ ते ७ हजार चमचे, १५० - २०० प्लेट, ३०० - ४०० प्लेट आणि १०० - १५० ग्लास गायब झाल्याचे त्यांनी फलकावर लिहले आहे. यामुळे त्यांना आत्तापर्यंत ५० हजारेचे नुकसान झाल्याचेही सांगण्यात येत आहे.