
मुंबई : भाजपविरोधात लढण्यासाठी जे पक्ष सोबत येतील, त्यांच्यासह लढण्याची काँग्रेसची भूमिका आहे. केंद्र व राज्यातील भाजपच्या सत्तेला उखडून टाकून काँग्रेसची सत्ता आणणारच, असा निर्धार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल काँग्रेसच्या मनात नाही तर जनतेत संभ्रम आहे. पण, इंडिया आघाडीसोबतच राहणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते याबाबत त्यांच्याशी चर्चा करतील, असेही ते म्हणाले.
वांद्रे येथील एमसीए क्लब येथे काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘इंडिया’ बैठकीची, ४८ लोकसभा मतदारसंघातील निरिक्षकांच्या अहवालावर चर्चा करण्यात आली. तसेच राज्यात ३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पदयात्रेची रूपरेषा ठरविण्यात आली. मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीची बैठक देशाला दिशा देणारी ठरेल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, आमदार कुणाल पाटील आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, महाराष्ट्र हे काँग्रेस विचारांचे राज्य आहे. काँग्रेस व मित्र पक्ष एकत्र लोकसभा निवडणुका लढल्या तर ४०-४५ जागा जिंकू शकू असे चित्र राज्यात आहे. त्यासाठी काँग्रेसची तयारी करत आहे. त्यामुळे जे पक्ष सोबत येतील त्यांच्यासह लढण्याची काँग्रेसची भूमिका आहे, असेही ते म्हणाले. अजित पवार व शरद पवार भेटीवर बोलताना पटोले म्हणाले, ‘‘काँग्रेसमध्ये शरद पवारांबद्दल संभ्रम नाही तर जनतेत संभ्रम आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत, निर्णय घेण्यास ते सक्षम असून त्यांनी या भेटीवर त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. इंडिया आघाडी सोबतच राहणार असल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे. या सर्व परिस्थितीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते लक्ष ठेवून आहेत, मुंबईतील इंडिया बैठकीच्या वेळी ते शरद पवार यांच्याशी चर्चा करतील, असेही पटोले यांनी सांगितले.