मध्य रेल्वेची एसी आणि प्रथम श्रेणीमधील ३७९ फुकट्या प्रवाशांवर कारवाई

एसी लोकलमध्ये सध्या तिकीट तपासनीस नाहीत. याचाच गैरफायदा घेऊन मध्य रेल्वेवरील काही प्रवासी बिनदिक्कतपणे विनातिकीट प्रवास करीत आहेत
मध्य रेल्वेची एसी आणि प्रथम श्रेणीमधील ३७९ फुकट्या प्रवाशांवर कारवाई

मध्य रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांचा वावर वाढला आहे. विनातिकीट प्रवास करत असताना प्रथम श्रेणीमध्येही सर्वाधिक फुकटे प्रवासी प्रवास करतात. याचा प्रथम श्रेणीच्या तिकीट आणि पासधारक प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. एसी लोकल प्रवासाबाबतही हीच स्थिती आहे. मध्य रेल्वेतील तिकीट तपासनीसांनी मंगळवार २९ नोव्हेंबर रोजी राबवलेल्या विशेष मोहीमेत एसी आणि प्रथम श्रेणीमधील एकूण ३७९ फुकट्या प्रवाशांना दंड ठोठावला आहे.

मध्य रेल्वेने ५ मे पासून एसी लोकलच्या तिकिटांच्या दरात कपात केल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलला प्रतिसाद वाढू लागला आहे. प्रतिसाद वाढत असल्यामुळे होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन या लोकलमध्ये विनातिकीट प्रवासी घुसखोरी करू लागले आहेत. काही प्रवाशांकडे एसी लोकलचे तिकीट नसते, तर काही प्रवासी प्रथम किंवा द्वितीय श्रेणीचे तिकीट काढून बिनदिक्कतपणे या लोकलमधून प्रवास करीत असल्याचेही आढळले आहे. एसी लोकलमध्ये सध्या तिकीट तपासनीस नाहीत. याचाच गैरफायदा घेऊन मध्य रेल्वेवरील काही प्रवासी बिनदिक्कतपणे विनातिकीट प्रवास करीत आहेत. दरम्यान, मध्य रेल्वेच्या लोकलमधील प्रथम श्रेणीचे डबे द्वितीय श्रेणीच्या डब्याच्या तुलनेत लहान आहेत. अशा वेळी विनातिकीट किंवा द्वितीय श्रेणी तिकीट आणि पासधारक प्रवासी प्रथम श्रेणीमधून सर्रास प्रवास करीत आहेत. त्यामुळे सकाळी किंवा सायंकाळी गर्दीच्या वेळी प्रथम श्रेणी तिकीट आणि पासधारकांना आसनही उपलब्ध होत नाही. रेल्वेने मंगळवारी राबविलेल्या विशेष मोहिमेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या ३७९ प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये प्रथम श्रेणीच्या डब्यातील २५८ आणि एसी लोकल डब्यातील १२१ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in